महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, तर महायुतीविरोधात...", ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा - CHHAGAN BHUJBAL

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी मुंबईत रविवारी (22 डिसेंबर) बैठक घेत भुजबळांना आपला पाठिंबा जाहीर केला.

CHHAGAN BHUJBAL
छगन भुजबळ (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 10:42 PM IST

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसनं मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील ओबीसी नेत्यांनी मुंबईत रविवारी (22 डिसेंबर) बैठक घेत भुजबळांना आपला पाठिंबा जाहीर केला. भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

...अन्यथा महायुती सरकार विरोधात भूमिका घेणार : मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध जात समूहाचे ओबीसी नेते यांची मुंबईतील महिला विकास मंडळ येथे बैठक घेण्यात आली. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला. भुजबळांना पक्ष नेतृत्वानं, महायुती सरकारनं सन्मानानं आणि आदरानं मंत्रिमंडळात स्थान द्यावं, अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी केली. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, तर महाराष्ट्रतील सर्व ओबीसी संघटना, समाज रस्त्यावर उतरेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती सरकार विरोधात भूमिका घेतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. या बैठकीला उपस्थित असलेल्या ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांची सायंकाळी मुंबईतील त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली.

सरकारमध्ये बिनकामाचे मंत्री, कामाचा माणूस बाहेर ठेवला :महायुती सरकारमध्ये बिनकामाचे मंत्री केले आणि कामाचा माणूस बाहेर ठेवला, अशी टीका शेंडगे यांनी केली. "सरकारमध्ये असलेल्या ओबीसी मंत्र्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडून मंजूर करुन घ्यावा, राज्यातील 33 हजार जागांवर डल्ला मारण्यात आला आहे. त्या जागा परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतात हे पाहणार आहोत," असं शेंडगे म्हणाले. भाटिया समितीचा अहवाल फेटाळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या जागा पुन्हा मिळत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली. "मनोज जरांगेचं वादळ समर्थपणे पेलण्याचं काम भुजबळांनी केलं. भुजबळ मंत्रिमंडळात असले किंवा नसले, तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू," असं शेंडगे म्हणाले. या बैठकीला प्रकाश शेंडगे, वकील मंगेश ससाणे आणि इतर नेते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणाची पाठराखण केल्यामुळं मंत्रिमंडळातून वगळलं? : मंत्रिमंडळातून वगळण्याच्या निर्णयामुळं राज्यातील ओबीसी नेते त्रस्त असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. "राज्यात ओबीसी आरक्षणाची पाठराखण केल्यानं हा निर्णय घेतला असावा, त्याबाबत काही सांगता येत नाही, असा सूर बैठकीत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत राज्यभरात हा प्रश्न नेऊन नागरिकांमध्ये जागृती करण्याचा निर्णय ओबीसी नेत्यांनी घेतला आहे. आपला पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र, भूमिका घेण्यासाठी अजून वेळ लागेल," असं भुजबळ म्हणाले. "पक्षानं राज्यसभेत जायला सांगितलं, म्हणजे विधानसभेत राजीनामा द्यावा लागेल. तरुणांना संधी देण्याचं सांगत आहेत, तेव्हा मी वयस्कर नव्हतो का? मी दिल्लीला जाण्यासाठी तयार होतो, तेव्हा पक्षानं सांगितलं की तुमची राज्यात गरज आहे, आता माझी गरज संपली का?" असा सवाल भुजबळांनी विचारला आहे.

हेही वाचा

  1. ठराविक खातं न मिळाल्यानं राज्यातील काही मंत्री नाखूष, अजित पवार यांची स्पष्टोक्ती
  2. "राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू", महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
  3. राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे "नौटंकी", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details