अमरावती Anil Bonde Controversial Statement :राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं वादग्रस्त वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केलं. दरम्यान त्यांच्याविरोधात अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केलीय. तक्रार दाखल करण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर धडकला.
पोलीस आयुक्तालयात गोंधळ : अनिल बोंडे यांच्या विरोधात तक्रार देण्याकरता काँग्रेसचा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर धडकला असता पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस आयुक्तालयात जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी रोखल्यामुळं आमदार यशोमती ठाकूर प्रचंड संतापल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला रोष :पोलीस आयुक्तांच्या दालनात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदींनी अनिल बोंडे यांच्या वक्तव्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे रोष व्यक्त केला. अनिल बोंडे यांची भाषा शहरात आणि राज्यात अशांतता पसरवणारी असून त्यांचा उद्देश केवळ दंगली भडकवणं आहे, असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी पोलीस आयुक्तांना सांगितलं.