ठाणे :राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरून चर्चा रंगली आहे. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्रिपदासाठी केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असं ते म्हणाले. तसंच, महायुतीचा भविष्यातील 'प्लॅन' काय असेल याचं उत्तर त्यांनी शायरीतून दिलं.
एकनाथ शिंदेचं शायरीतून उत्तर : "सर्वसामान्य जनतेसाठी शक्य त्या सर्व गोष्टी केल्या. आम्ही घरात बसून राहिलो नाही. केंद्र सरकारकडून लाखो करोडो रुपयांचा निधी आणला आणि यातून महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य बनवलं," असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी महायुतीचा भविष्यातील 'प्लॅन' काय असेल हे शायरीतून सांगितलं. "जीवन मे असली उडान बाकी है, अभी तो नापी है मुट्टीभर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है," या शायरीतून एकनाथ शिंदे यांनी भविष्यातील प्लॅन सांगितला.
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी :एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते "आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवेत," अशी घोषणाबाजी करत होते. एकनाथ शिंदे यांच्या पत्रपरिषदेच्या दरम्यान कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते, त्यामुळं पोलिसांना काही काळ बंगल्याबाहेरचा रस्ता बंद करावा लागला.