अकोला :अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला त्यांनी उभा केलेल्या उमेदवारानं धोखा दिल्यानंतर या मतदारसंघात वंचितकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळं आता वंचित कोणाला पाठींबा देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतू, वंचितनं आज (11 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार हरिष आलीमचंदानी यांना पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं. वंचितच्या पाठींब्यामुळं अपक्ष आलीमचंदानी यांची ताकद वाढली असली तरी भाजपाला मात्र टेंशन आलं आहे. कारण या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला पक्षातूनच विरोध आहे, तसंच नागरिकांमध्येही रोष आहे. त्यामुळं गेल्या 6 निवडणुकांमध्ये एकहाती झेंडा रोवणारा मतदारसंघ भाजपा गमावत असल्याचं दिसत आहे.
वंचितचा बालेकिल्ला : अकोला जिल्हा हा वंचितचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपले पाचही उमेदवार मतदार संघात उभे करीत असते. बाळापूर आणि अकोला पूर्व मतदारसंघात वंचितांचे उमेदवार निवडूनही आले आहेत. मात्र, 2014 पासून वंचितला एकही मतदारसंघ मिळविता आला नाही. यावेळी मात्र, वंचितनं चांगली खेळी करून उमेदवार उभे केले होते. अकोला पश्चिममध्ये वंचितला चांगला उमेदवार मिळत नव्हता. मात्र, काँग्रेसकडून उमेदवारी मागणारे माजी आमदार अजहर हुसेन यांचे पुत्र झिशान हुसैन यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी वंचितमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली.
वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी : वंचितनं अकोला पश्चिममध्ये झिशान हुसेन यांना उमेदवारी दिल्यानं चांगला उमेदवार मिळाला, असं म्हटलं होतं. परंतु, उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी झिशान हुसैन यांनी वंचितकडून आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळं वंचितसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. परिणामी, अकोला जिल्यात वंचितची राजकीय नाचक्की झाली होती. त्यासोबतच झिशान हुसैन यांच्याविरोधात ही वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.