मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात ठिकठिकाणी निष्ठा यात्रा करणाऱ्यांनाच विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी डावललं जात चित्र सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटात सध्या नाराजीची लाट असून याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उमेदवारी मिळेल, अशी निष्ठावंत शिवसैनिकांना आशा : शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर आमदार, खासदार, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी मूळ पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. पक्षात गद्दारी झाली, असा आरोप करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठा यात्रा देखील काढण्यात आली. त्यातून आदित्य ठाकरे यांनी शिंदे समर्थकांना थेट आव्हान दिलं होतं. पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे गेल्यानंतरही निष्ठा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. पक्ष फुटला असला, तरी शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी केला होता. निष्ठावंत शिवसैनिकांनीदेखील पक्षाच्या कठीण काळात ठाकरेंना खंबीरपणे साथ दिली. 'सध्या हातात काहीच नाही,' असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंतांना केलं होतं. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्ष उमेदवारी देईल, अशी आशा या निष्ठावंत शिवसैनिकांना होती.
उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांना डावललं :आता ऐनवेळी उमेदवार आयात करून उध्दव ठाकरेंनी निष्ठावंतांना डावलल्याची तक्रार ऐकायला मिळतेय. काहींकडून बंडखोरीचा सूचक इशाराही देण्यात आलाय. त्यामुळं आता ठाकरेंचीच डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मेळावे घेतले, निष्ठा यात्रा काढल्या. या यात्रेमध्ये शिवसेनेचे अनेक निष्ठावंत नेते कार्यकर्ते पाहायला मिळाले. यामधलं एक नाव म्हणजे सुधीर साळवी. सुधीर साळवी यांना या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला होता अशा चर्चा आहेत. मात्र, इथं विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यानं सध्या सुधीर साळवी हे बंडाच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.
निष्ठावंत राहिलो, ही चूक झाली :रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी निष्ठावंत उदय बने यांना डावललं असल्याचं बोललं जातंय. बने यांनी पक्षनेतृत्वाला यावरूनखडे बोल सुनावलेत. 'माने यांना घेताना किमान कल्पना द्यायला हवी होती. परंतु, तसं झालं नाही. आम्ही निष्ठावंत राहिलो, ही चूक झाली? की आमची निष्ठा कमी पडली?' असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय. सक्षम असताना पक्षानं उमेदवारी का नाकारली? याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणीही बने यांनी केली. या भागातून सध्या बने बंडाच्या तयारीत असून ते आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.