मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी रात्री मनसेची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राज ठाकरेंनी 45 उमेदवारांची घोषणा केली. यात अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अमित ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान : माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील असल्याच्या चर्चा मागील काही दिवस रंगल्या होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीनुसार अमित ठाकरे यांच्या विरोधात माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळं 'राज'पुत्रासमोरील आव्हानं वाढली असून, या दुहेरी आव्हानाला अमित ठाकरे कशाप्रकारे तोंड देतात ते निवडणुकीच्या रणधुमाळीत स्पष्ट होईल.
ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला :माहीम विधानसभा मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. आता अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटानं माहीममधून सध्याचे विभाग प्रमुख महेश सावंत यांचं नाव जाहीर केलं आहे. माहीम मतदारसंघासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी महेश सावंत आणि प्रकाश पाटणकर या दोन नावांचा विचार सुरू होता. मात्र, इथे महेश सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.
मतदार कोणत्या बाजूनं जाणार? : माहीम विधानसभेचा विचार केला असता, मागील वर्षानुवर्षे हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात इथला कोळी समाज आणि मुस्लिम समाज प्रमुख मतदार मानला जातो. यातील कोळी समाज हा प्रामुख्यानं शिवसेनेचा मतदार राहिला आहे. तर, मुस्लिम समाज हा काही प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचा तर काही प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचा मतदार राहिलाय. माहीम मधील एकूण मतदारांची संख्या पाहता या मतदारसंघात 2 लाख 25 हजार 367 मतदार आहेत. त्यातच यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन शिवसेना असल्यानं इथले मतदार नेमके कोणत्या शिवसेनेच्या बाजूनं मतदान करतात की अमित ठाकरेंना मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माहीम मतदारसंघात काही आकर्षणाची ठिकाणी देखील आहेत. इथली चौपाटी, माहीम किल्ला, त्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली माहीम कोळीवाड्यातील खाऊ गल्ली हा देखील सध्या आकर्षणाचा विषय बनलाय. त्यामुळं इथल्या स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. या मतदारसंघात काही समस्या देखील आहेत. वाहतूक कोंडीची समस्या, खड्ड्यांची समस्या, पावसाळ्यात दरवर्षी तुंबणारं पाणी माहीमकरांच्या या सर्व समस्या कोणता उमेदवार सोडवतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हेही वाचा
- महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांचं 85-85-85 जागांवर एकमत, उर्वरीत जागा घटकपक्षांसाठी, एकूण 270 जागांवर सहमती
- शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती
- राज्यातील किती आमदारांवर खुनाशी संबंधित, बलात्काराचे गुन्हे दाखल? आकडेवारी पाहून बसेल धक्का