नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सभा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 5 लाखांहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलं. जल जीवन अभियानांतर्गत राज्यातील 1.25 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 7 कोटी गरीब लोकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळत आहे, 26 लाखांहून अधिक लोकांना पीएम आवास योजनेचा फायदा झाला आहे, त्यांना स्वतःचं घर सरकारकडून देण्यात आलं, त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे."
लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा :"डबल इंजिनच्या सरकारमध्ये विकासाचा वेग दुप्पट होतो. त्यासोबतच योजनांचा लाभही दुप्पट होतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. राज्यात पुन्हा आमचं सरकार आल्यावर ही 12,000 रुपयांची मदत वाढवून 15,000 रुपये केली जाईल, ज्यामुळं लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा होईल,"असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेसला त्यांची जागा दाखवावी : "जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं कलम 370 हटवून भारताचं संविधान लागू केलं. तेथील दलित, वंचितांम त्यांचा हक्क मिळवून दिला. मात्र विधानसभेत सत्ता येताच काँग्रेस व त्यांच्या बगलबच्यांनी पुन्हा तेथे कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. काश्मीरमध्ये संविधानाला पायदळी तुडवायचं आणि इकडे महाराष्ट्रात येवून संविधानाचा जप करीत लोकांमध्ये धूळफेक करायची, अशी दुहेरी निती काँग्रेसवाल्यांनी चालविली आहे. महाविकास आघाडीवाले देशाला मागे खेचण्याचं काम करतायत. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. काँग्रेसच्या या धुळफेकीला वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी," असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत बोलताना केलं.
सभेतील ठळक मुद्दे :
-पंतप्रधान मोदींचा 'जय भवानी जय शिवाजी'चा नारा.
-प्रभू राम पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीला माझा नमस्कार.
-मी अनुष्ठानची सुरुवात काळाराम मंदिरमधून केली, तिथे सेवा पण केली.
-विकसित भारतसाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
-भाजपा, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
-पु ल देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
-गरीबाची चिंता करणारं सरकार आहे देशात
-काँग्रेसने फक्त 'गरिबी हटावो'चा नारा दिला
-25 करोड लोक गरिबीमधून बाहेर आले.
-मोदी गरिबांचा सेवक म्हणून काम करत आहे.
-महाराष्ट्रमध्ये 50 लाख महिलांना गॅस योजना, शेती योजना, शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार मदत वाढवून ती 15 हजार करणार.
-डबल इंजिन सरकारमध्ये विकास गती वाढणार.
-कांदा निर्यात सवलत दिली