मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज (8 नोव्हेंबर) धुळे आणि नाशिकमध्ये सभा होत आहे. तर अमित शाह यांच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा होणार आहेत. या सभांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय.
असा असणार संपूर्ण दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचाराची पहिली सभा धुळे येथे दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. त्यानंतर त्यांची दुसरी सभा नाशिक येथे 2 वाजता होईल. पंतप्रधान मोदी यांची 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेड, 12 नोव्हेंबरला चिमूर, सोलापूरला सभा होणार असून पुण्यात रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.