मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जनतेची कामं करण्यासाठी आमदारांची निवड केली जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, राज्यातील अनेक विद्यमान आमदारांवर महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत. तर काहींवर खुनाचा तर काहींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. हे या आमदारांनी स्वतः त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगितलंय. ही आकडेवारी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकांवर आधारित आहे.
गुन्हा दाखल असलेल्या आमदाराची संख्या : 272 विद्यमान आमदारांचं विश्लेषण केलं असता, 164 (60%) विद्यमान आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. 106 (39%) विद्यमान आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2 विद्यमान आमदारांवर खुनाशी (IPC कलम 302) संबंधित गुन्हा, तर 10 विद्यमान आमदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा (IPC कलम 307) गुन्हा दाखल आहे. धक्कादायक म्हणजे 12 विद्यमान आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. 12 विद्यमान आमदारांपैकी एका विद्यमान आमदारावर बलात्काराचा (IPC कलम-376) गुन्हा दाखल आहे.
गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची आकडेवारी (Source - ETV Bharat) गुन्हा दाखल असलेले पक्षनिहाय आमदार :भाजपाच्या 103 आमदारांपैकी 62 (60%), राष्ट्रवादीच्या 40 आमदारांपैकी 25 (63%), शिवसेनेच्या 38 आमदारांपैकी 22 (58%), काँग्रेसच्या 37 आमदारांपैकी 20 (54%), शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 16 पैकी 9 (56%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 12 पैकी 6 (50%) आणि 12 पैकी 9 (75%) अपक्ष आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची आकडेवारी (Source - ETV Bharat) गंभीर गुन्हा दाखल असलेले पक्षनिहाय विद्यमान आमदार : भाजपाच्या 103 आमदारांपैकी 38 (37%), राष्ट्रवादीच्या 40 आमदारांपैकी 14 (35%), शिवसेनेमधील 38 आमदारांपैकी 18 (47%), काँग्रेसमधील 37 आमदारांपैकी 11 (30%), शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 16 आमदारांपैकी 7 (44%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 12 पैकी 3 (25%) आमदार आणि 12 आमदारांपैकी 7 (58%) अपक्ष आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा
- विधानसभा निवडणुकीत प्रचारात कोणते मुद्दे असणार? 'या' मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होणार?
- जागवाटपाचा वाद सुटल्यानं महाविकास आघाडीची 'मशाल हातात', आज होणार महत्त्वाची घोषणा
- बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर