मुंबई CM Candidate Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुती की महाविकास आघाडीचा विजयी ध्वज लागणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी निवडणूक पूर्वतयारीला लागली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावर महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळं महायुतीत देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवारांची दावेदारी नकळत समोर आली. त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहे.
पहिलं बहुमत नंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा - अजित पवार : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं चांगलं प्रदर्शन केलं नसल्यामुळं विधानसभा निवडणुकीचा दबाव त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जागा विधानसभेत निवडून आणण्याचा प्रयत्न अजित पवार यांचा असणार आहे. राष्ट्रीय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार, यावर आपलं सडेतोड मत मांडलं. सर्वात प्रथम महायुतीतील घटक पक्षांना बहुमताचा आकडा पार करायचा आहे. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच 60 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
तो निर्णय सर्वांना मान्य - देवेंद्र फडणवीस : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. "निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. सत्ताधारी पक्ष हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जात असतो. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा भाजपा पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असणार आहे," असं म्हणत फडणवीसांनी चेंडू हा भाजपाच्या वरिष्ठांच्या कोर्टात टाकलाय.