नागपूर : नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडं एकूण ५७ लाख ७ हजार ८६७ रुपयांची चल, तर ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. महत्वाचं म्हणजे २०१९ च्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडं ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल संपत्ती, तर ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती होती. गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ झाली.
फडणवीस यांच्यावर ६२ लाखांचं कर्ज : देवेंद्र फडणवीस राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी माहिती जाऊन घ्यायला नागरिकांना आवडतं. राज्याचा गाडा हकणाऱ्या नेत्यांवर कर्ज आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रात दिलं आहे. त्यांच्यावर तब्बल ६२ लाख रुपयांचं कर्ज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे कर्ज त्यांनी अमृता फडणवीस यांच्याकडूनच घेतल्याचं नमूद केलंय. शपथपत्रातील नोंदीनुसार, सद्य:स्थितीत त्यांच्या एकट्याच्या नावावर सुमारे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत उपमुख्यमंत्र्यांची संपत्ती ही २३ टक्क्यांनी वाढली आहे. (जमिनींच्या बाजार मूल्यात गेल्या ५ वर्षांत झालेल्या वाढीमुळं अचल संपत्तीत वाढ)
पाच वर्षात संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ : २०१९ साली उपमुख्यमंत्र्यांकडं वैयक्तिकरीत्या ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल संपत्ती आणि ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ इतका होता. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ झाली. त्यांच्याकडं सध्या ५६ लाख ०७ हजार ८६७ रुपयांची चल, तर ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.