अमरावती :लाडक्या बहिणींना 50-60 वर्षात कधी पैसे मिळाले नाहीत, कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला नाही. शेतकऱ्यांना आज 12 हजार रुपये मिळत आहेत. मुलींना मोफत शिक्षण आम्ही दिलं. हे मी केलं नाही, आपल्या सरकारनं केलं, कारण हे सरकार सर्वसामान्यांचा आहे. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असं मी मानत नाही. सीएम म्हणजे कॉमनमॅन. मी एक कॉमनमॅन आहे आणि या कॉमनमॅनला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुपरमॅन करायचंय, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्यापूर येथं महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलं.
मागचं सरकार उलथवल्यामुळं विकास घडतोय : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सर्वसामान्य जनतेचा विकास करणारं सरकार अपेक्षित होतं. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारं स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समतेचं राज्य निर्माण करायचंय. आज आपल्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम, क्रिश्चन या सर्व धर्माच्या आणि जातीच्या माणसांना कुठलाही भेद न करता शासकीय योजनांचा लाभ मिळतोय. खरंतर मागचं सरकार उलथवल्यामुळंच आज महाराष्ट्रात विकास घडतोय," असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
आपली वाटचाल विकासाकडे : "जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहावे, असा निर्णय आपण घेतला. त्यासोबतच 25 लाख युवकांना रोजगार मिळाला पाहिजे हा देखील निर्णय आपण घेतला असून दहा लाख युवक, युवतींना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला. राज्यातील 45 हजार गावात पाणंद रस्ते बांधलेत. शहरी भागाप्रमाणंच गावांचा विकास झाला पाहिजे याकडे आम्ही लक्ष दिलं. अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच साडेसात एचपी पंपानं शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ केलं. सर्वसामान्य मध्यम वर्गातील ग्राहकांच्या वीज बिलामध्ये 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. विकासाचा हा केवळ ट्रेलर असून पिक्चर बाकी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.