छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'एक है तो सेफ है' वक्तव्यावरून 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. "मी मराठा समाजाला सलाम करतो, त्यांनी मोदींची झोप उडवली. मोदी तुम्ही जरांगे यांचा पराभव करू शकत नाही, जरांगेच तुमचा पराभव करतील. मोदी मराठा विरुद्ध ओबीसी करत आहेत. मी ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की, तुम्ही मोदींच्या कटात अडकू नका. मोदी हे एकीच्या नावाखाली सर्वांमध्ये भांडण लावत आहेत," असा हल्लाबोल ओवैसी यांनी केला.
महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : "पीएम मोदी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद करत आहेत. मोदी मी तुमच्या विचारधारेला जिवंत असेपर्यंत मानणार नाही. आम्ही कधीही कोणत्या जातीच्या विरोधात नाही आणि राहणार नाही. मी, कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र, तुमचा एक नेता म्हणतो घुसून मारू. आमचे लोक विधानसभेत गेल्यावर उत्तर देतील. 20 तारखेला मतदान करून यांना उत्तर द्या," असं आवाहन असदुद्दीन ओवैसी यांनी मतदारांना केलं.
प्रचार सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी (Source - ETV Bharat Reporter) पक्षात निर्णय मीच घेतो : "राज्यात अनेकजण इच्छुक असताना आम्ही 16 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील असले तरी ते निर्णय घेत नाहीत, ते फक्त चर्चा करतात. निर्णय मी घेतो," असं असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट करत पक्षांतर्गत असलेल्या नाराज वर्गाला शांत करण्याचा प्रयत्न केला. "भाजपानं मुस्लिम उमेदवार अनेक ठिकाणी उभे केले आहेत. अशा लोकांना एकही मत देऊ नका. 2024 लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मिळून जलील यांना हरवलं, पण आकाशावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यास थूक आपल्याच अंगावर येणार," अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभेत केली.
अनेक उद्योग बाहेर गेले : "महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला जात आहेत. 6 महिन्यात मराठवाड्यात 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्रात झाली. अर्थसंकल्पात कृषीसाठी बजेट कमी केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुमच्या खिशातून दिले का?," असा सवाल करत असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा
- वरळीकर माझ्या बाजूने कौल देतील, आदित्य ठाकरे यांना विश्वास
- मतांसाठी लाडक्या बहिणींना धमकी, राजकीय दबाव तंत्राचा वापर, संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
- उद्धव ठाकरे, तुम्ही कुठे बसलात याची आठवण करून देतो..अमित शाह यांचा हल्लाबोल