मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. हितेंद्र ठाकूर यांच्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तावडे यांना अटक करा : भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे, त्यामुळं त्यांनी राज्यात पैसे वाटप सुरु केले. विरारमधील प्रकरण हे त्याचाच एक भाग आहे, पैसे वाटप करणाऱ्या भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी पाच कोटी रुपये घेऊन मतदारसंघात पैसे वाटप केले. त्यामुळे तावडे यांना अटक करावी," अशी मागणी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली. "कितीही पैसे वाटले तरी राज्यात भाजपा व महायुतीला विजय मिळणार नाही. महाराष्ट्रातील जनता सत्ता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. ज्यांनी ज्यांनी पैसे वाटप केले त्याविरोधात कारवाई करावी. राज्यात भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रचंड पैसे वाटप सुरु केले आहे, त्याची चौकशी व्हावी व निवडणूक आयोगाने त्याविरोधात तातडीने कारवाई करावी," अशी मागणी रमेश चेन्निथला यांनी केली.
पैसे वाटणे म्हणजे अत्यंत दुर्दैव : "विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीत पैसे वाटावं लागतय हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. "महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने पैसे वाटले असते तर ठीक. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि असे पैसे वाटणे म्हणजे अत्यंत दुर्दैव आहे. कोट्यवधी रुपये पकडुन देखील अतिशय कमी पैसे दाखवण्याचं काम पुन्हा होईल," अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले : "अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला. विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगानं विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. संविधान आणि लोकशाहीचा अपमान भाजपा वेळोवेळी करत आलीये. आता बस्स झालं," असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.
जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता आहे," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केली.
भाजपाचा खेळ खल्लास : या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगालाही टोला लगावला. ते म्हणाले, "भाजपचा खेळ खल्लास, जे काम निवडणूक आयोगाने करायला हवं होतं ते काम हितेंद्र ठाकुर यांनी केलं. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो."
तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? :"भाजपाचे राज्य व राष्ट्रस्तरावरील मोठे नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या एक दिवस आधी 5 कोटी रुपयांची कॅश रंगेहात पकडलं जाणं, हे अत्यंत गंभीर आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन तावडे हॉटेलमध्ये काय करत होते? राज्यात सत्ता आणि पैशाचा माज चालु आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी बघतेय. उद्या मतदानाच्या दिवशी भाजपला अद्दल घडवल्याशिवाय लोक स्वस्थ बसणार नाहीत," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया : "नालासापोरा येथे आमदारांची बैठक सुरु होती. आदर्श आचारसंहिता आहे. मतदानाच्या दिवशी व्होटिंग मशीन कशी सील केली जाते, काही आक्षेप असतील, तर कसं नोंदवायचे? हे सांगण्यासाठी तिथं गेलो होतो. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांना वाटलं की, मी तिथे पैसे वाटण्यासाठी आलोय. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या घटनेवर चौकशी करुदे. त्यातून सत्य काय ते समोर येईलच," अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिलीय.
हेही वाचा
- नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटल्याचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं
- मतदान कार्ड जमा करुन लोकशाहीचा हक्क न बजाविण्यासाठी दिले पैसे? दोघांना अटक
- भ्रष्ट राजवट खत्म होऊ दे, तावडेंच्या पैसे वाटपावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?