महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

काँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 'या' चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा; गडकरींविरोधात विद्यमान आमदाराला तिकीट - Lok Sabha Elections 2024 - LOK SABHA ELECTIONS 2024

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. यात महाराष्ट्रातील 4 जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. या जागांवर पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 'या' चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा; गडकरींविरोधात विद्यमान आमदारला तिकीट
काँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 'या' चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा; गडकरींविरोधात विद्यमान आमदारला तिकीट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 7:05 AM IST

मुंबई Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं शनिवारी रात्री 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसनं नागपुरातून विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिलीय.

गडकरींविरोधात विकास ठाकरे : विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. नागपूर महापालिकेचे माजी महापौर राहिलेल्या ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सुधाकर देशमुख यांचा पराभव केला होता. ते नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्षही राहिले आहेत. विकास ठाकरे हे नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्षही आहेत.

  • कॉंग्रेसचे आतापर्यंत 11 उमेदवार जाहीर : राज्यातील महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसनं आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. काँग्रेसच्या चौथ्या यादीत नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या जागांचा समावेश आहे. या जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

रश्मी बर्वे यांना रामटेकमधून तिकीट : काँग्रेसनं रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे आणि गडचिरोली-चिमूरमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिलीय. बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांना रामटेक मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी करत असल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना तिकीट दिलंय.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात समाविष्ट झालेल्या चंद्रपूरच्या जागेसाठी काँग्रेसनं अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी आणि स्थानिक आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं चंद्रपूर ही महाराष्ट्रातील एकमेव जागा जिंकली होती. यावेळी भाजपानं राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिलीय.

काँग्रेसच्या चौथ्या यादीत 45 जागांसाठी उमेदवारांची घोषणा : कॉंग्रेस पक्षानं चौथ्या यादीत उत्तर प्रदेशातील 9 जागांसह एकूण 45 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. मध्य प्रदेशात पक्षानं दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना राजगड मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. उत्तर प्रदेशात ज्येष्ठ नेते अखिलेश प्रताप सिंह यांना देवरियातून तिकीट देण्यात आलंय. दरम्यान, अमरोहामध्ये दानिश अली यांचा सामना भाजपाच्या कंवरसिंह तन्वर यांच्याशी होणार आहे. पक्षानं आतापर्यंत 183 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

  • काँग्रेसची चौथी यादी : कॉंग्रेसनं आपल्या चौथ्या यादीत मध्य प्रदेशातील 12, तामिळनाडूमध्ये 7, महाराष्ट्रात 4, राजस्थानमधील 3, जम्मू काश्मीर, मणिपूर आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी 2 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात केले आहेत. तर आसाम, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबारमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

आतापर्यंतचे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील जाहीर उमेदवार : काँग्रेसनं आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 11 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यात पहिल्या यादीत नंदुरबारमधून गोवल पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचा समावेश होता. तर शनिवारी रात्री जाहीर झालेल्या यादीत नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. काँग्रेसचा अंतर्गत वाद शिगेला; विजय वडेट्टीवारांच्या विरोधातील 'त्या' व्हायरल पत्राबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप - Vijay Wadettiwar viral letter
  2. महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात - Congress Candidate List

ABOUT THE AUTHOR

...view details