मुंबई Kiran Samant : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. आज अखेरीस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर करत नारायण राणे यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळं आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही लढत होणार आहे.
किरण सामंतांनी थोपटले होते दंड : महायुतीच्या जागा वाटपात गेल्या काही दिवसांपासून चार जागांचा अडसर निर्माण झाला होता. यात महत्त्वाची जागा होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची. या जागेवरुन निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत आग्रही होते. काही झालं तरी ही जागा आपण लढवणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. किरण सामंत यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्यामुळे या जागेवरची उमेदवारी घोषित करण्यात महायुतीसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. किरण सामंत यांनी 'एक्स' पोस्टच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवणारच, असं सांगत उमेदवारी अर्ज सुद्धा विकत घेतला होता. त्यामुळं तणाव अधिक वाढला होता. किरण सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अर्ज विकत घेतल्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली होती.
किरण सामंत यांची काढली समजूत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी किरण सामंत यांची समजूत काढल्यानंतर अखेरीस पक्ष हितासाठी आणि महायुतीच्या विजयासाठी किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलंय.