मुंबई Assembly Election 2024 :आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केलीय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांनी आपल्या विविध मुद्द्यांवर आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरवर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घ्यायची ठरवलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांना हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. नितेश राणे अत्यंत जहाल शब्दात प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत तर, एका विशिष्ट समाजावर सातत्यानं शेरेबाजी करणं आणि टीका करणं त्यांनी सुरू ठेवलं आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळं आणि वक्तव्यामुळं त्यांच्याच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतली आहे.
महायुतीमध्येच वैचारिक तणाव : अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात अशा पद्धतीची वक्तव्यं करणं योग्य नसल्याचं म्हटलय. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणं योग्य नाही असं जाहीर मत अजित पवार यांनी व्यक्त केल्यानं आता महायुतीमध्येच वैचारिक तणाव असून तो मतदारांसमोर येऊ घातला आहे. अशा परिस्थितीत महायुती म्हणून मतदारांसमोर जाताना काय अडचणींना सामोरं जावं लागेल आणि ही वैचारिक भूमिका कशी मांडणार याबाबत दोन्ही पक्षांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलय.
प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते संजय तटकरे (ETV Bharat Reporter) भाजपा प्रखर हिंदुत्वावर कायम - कुलकर्णी : या संदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले, "भारतीय जनता पक्ष कायम आपल्या विचारधारेसोबत आहे आम्ही कधीही हिंदुत्वापासून दूर गेलो नाही आणि जाणार नाही. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे त्यांच्या विचारधारेशी आणि भूमिकेशी एकनिष्ठ आहेत, म्हणूनच ते हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करत आहेत. अलीकडं एका विशिष्ट समाजाला मस्ती आली आहे आणि त्या विरोधात ते आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत. सत्ताधारी पक्ष म्हणून जरी आम्ही असलो तरी सत्ता ही वेगळी आहे आणि पक्षाची भूमिका वेगळी आहे. पक्ष म्हणून आम्ही आमच्या विचारधारेशी कायम एकनिष्ठ आहोत आणि नितेश राणे तेच करत आहेत. अजित पवार यांना जरी ते पटत नसलं तरी आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. सरकार म्हणून काही मुद्द्यांवर आम्ही एकत्र आलो आहोत". मात्र, त्यासाठी लोकांमध्ये असलेली आमची प्रतिमा आम्ही बदललेली नाही. यापुढेही मतदारांसमोर जाताना आम्ही प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच जाणार आहे.
आमची भूमिका धर्मनिरपेक्षच - तटकरे :या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते संजय तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर पहिल्यापासून ठाम आहोत. सरकारमध्ये समाविष्ट होताना सुद्धा आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली होती. सरकारमध्ये आम्ही काही समान कार्यक्रम घेऊन सहभागी झालो आहोत. मात्र, आमची भूमिका ही नेहमीच धर्मनिरपेक्ष विचारांची राहिली आहे आणि या भूमिकेशी आम्ही कायम ठाम असणार आहोत. अजित पवार यांनी मांडलेली आपली भूमिका ही यासंदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळं त्यांनी स्पष्टपणे याबाबतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. यापुढेही आम्ही आमच्या धर्मनिरपेक्ष मतांशी आणि विचारांशी कायम बांधिलकी ठेवून असणार आहोत. भारतीय जनता पक्ष आणि नितेश राणे यांची विचारधारा वेगळी आहे. ते त्यांच्या विचारांचा प्रसार लोकांपुढे करतील आम्ही आमचे विचार घेऊन लोकांपुढे जाऊ. आम्हाला मानणारा वर्ग हा धर्मनिरपेक्ष वर्ग आहे. त्यामुळं विचारांची या मुद्द्यावर फारकत असली तरी, बाकीच्या मुद्द्यांवर आम्ही समान कार्यक्रम घेऊन आहोत. त्यामुळं आमच्या मतदारांनाही माहीत आहे की, आम्ही कोणत्या विचाराचे आहोत. त्यामुळं मतदारांपुढं जाताना आम्हाला त्याची अडचण येईल असं वाटत नाही.
महायुतीची वैचारिक गोची-जोशी : या संदर्भात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी सांगितलं की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे हे उघड आहे. भाजपा आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मतदारांसमोर जाणार हे स्पष्टच आहे. तर भाजपाचे हिंदुत्व शिवसेना शिंदे गटानंही मान्य केल्यानं आता ते संयुक्तरित्या ही भूमिका मतदारांपुढे मांडतील. मात्र, असं असलं तरी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या पक्षानं कायम आपण धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगितलं. त्यांची ही भूमिका अद्याप बदललेली नाही आणि यापुढेही ती बदलेल असं नाही. कारण त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाणंही टाळलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते मात्र संघाच्या कार्यालयात जातात. हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत आणि सत्तेच्या किमान समान कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. असं असलं तरी त्यांची वैचारिक भूमिका ही वेगळी आहे. जेव्हा ते मतदारांसमोर जातील, तेव्हाही त्यांची वैचारिक भिन्नता निश्चितच जनतेसमोर येणार आहे. याचा फटका त्यांना काही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- बापरे! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार? नेमकं प्रकरण काय? - Ladki Bahini Yojana
- महाराष्ट्रातील अराजकता अन् तोतयागिरीचा नायनाट करणार; उद्धव ठाकरेंचं 'गीता'च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल - Uddhav Thackeray New Song
- महाराष्ट्रात महायुती १७० पार करणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास, संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका - Chandrakant Patil