हैदराबाद Congress Candidate From Hyderabad : तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा जागेसाठी काँग्रेसनंही आपला उमेदवार जाहीर केलाय. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात काँग्रेसनं मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी दिलीय. वलीउल्लाह समीर हे हैदराबाद काँग्रेस कमिटीमध्ये अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख आहेत. ते हैदराबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही आहेत. हैदराबादशिवाय तेलंगणातील अन्य दोन जागांसाठी काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षानं करीमनगरमधून व्ही. राजेंद्र राव आणि खम्मम लोकसभा मतदारसंघातून आर रघुराम रेड्डी यांना तिकीट दिलंय.
तिरंगी लढतीची शक्यता : ओवेसींच्या विरोधात निवडणूक प्रचारात मेहनत घेणाऱ्या माधवी लता यांना भाजपानं हैदराबादमधून उमेदवारी दिलीय. त्यातच आता हैदराबादमधून काँग्रेसनं आपला उमेदवार उभा केल्यानंतर या हायप्रोफाईल जागेवरील लढत रंजक ठरु शकते. वलीउल्लाह समीर यांच्या उमेदवारीमुळं हैदराबादमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तसंच यामुळं मतांचं ध्रुवीकरण होऊन भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांना फायदा होऊ शकतो.
हैदराबादमध्ये एआयएमआयएमची मजबूत पकड :हैदराबाद हा अनेक दशकांपासून एआयएमआयएमचा बालेकिल्ला आहे. परिसरातील मतदारांवर ओवेसी यांची मजबूत पकड आहे. ओवेसी 2004 पासून संसदेत हैदराबादचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी एआयएमआयएमनं हैदराबादमधून अकबरुद्दीन ओवेसी यांना डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काही कारणास्तव असदुद्दीन ओवेसी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेल्यास अकबरुद्दीन यांना पक्षाचं उमेदवार बनवलं जाऊ शकतं. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी हैदराबादमध्ये मतदान होणार आहे.
2019 निवडणुकीचं चित्र काय :असदुद्दीन ओवेसी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे तीन लाख मतांच्या फरकानं विजय मिळवला होता. ओवेसी यांना 5,17,100 मतं मिळाली होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार भगवंत राव यांना 2,35,285 मतं मिळाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या फिरोज खान यांना केवळ 49,944 मतं मिळाली होती.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी उद्या मतदान, कोणते उमेदवार आहेत रिंगणात? - lok sabha election 2024
- लोकसभा निवडणूक 2024 : वंचितचा नवा गेम प्लान ? अधिकृत उमेदवाराला दिला नाही एबी फॉर्म - Lok Sabha Election 2024