मुंबई Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्री कोण असेल? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना, मागील काही दिवसांपासून 'भावी मुख्यमंत्री' या आशयाचे पोस्टर अनेक ठिकाणी बघायला मिळत आहेत. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या नेत्यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे पोस्टर्स कार्यकर्त्यांकडून लावले जाताय. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांचेही 'भावी मुख्यमंत्री' या आशयाचे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आलेत.
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री : 27 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे पोस्टर्स मुंबईतील दादर परिसरात गोखले रोडवर लावण्यात आलेत. नुकताच 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे बॅनर मंत्रालय परिसरात झळकले होते. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे बॅनर आलेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात सर्वच नेत्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, अशी चर्चा रंगू लागली आहे.