शिर्डी :राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज (15 डिसेंबर) नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नव्या सरकारच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला. तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया : साईबाबांच्या दर्शनासाठी ते शिर्डीला आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आमच्या सरकारच्या हातून चांगलं काम घडावं, माझ्या हातून कोकणात चांगली सेवा घडावी, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली. येत्या दोन वर्षात माझ्या कोकणात एवढं काम करेन, की दिल्लीही मला बोलवेल," असं वक्तव्य दीपक केसरकर शिर्डीत केलं. यावेळी साईबाबांच्या धुप आरतीलाही केसरकर यांनी हजेरी लावली.
आत्मचिंतन करणार : आपल्याला मंत्रिपद का मिळालं नाही? याचं आत्मचिंतन करणार असून आमचे नेते एकनाथ शिंदे यांना आतापर्यंत मी केवळ दोन वेळा भेटलो आहे. पहिल्यांदा भेटलो त्यावेळी अनेक आमदार मंत्री होण्यासाठी शिंदेना भेटत होते. दुसऱ्या वेळी भेटायला गेलो, तर शिंदेंना भेटण्यासाठी 5 तास मी थांबलो, अशी चर्चा माझ्या बद्दल सुरु होती. मी भेटायला गेलो त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले त्यामुळं माझी भेट झाली नाही. मंत्रिपदासाठी आपणच आपल्या नेत्यावर दबाव आणायचा, हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. त्यामुळं मी तिथून निघून गेलो असल्याचंही यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.