नागपूर CBI registers FIR Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला.
नवं कारस्थान रचण्यात आलं :नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "गेल्या तीन वर्षापासून काय चालू आहे हे ते जनता पाहात आहे. तीन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणीस यांनी परमवीर सिंग आणि सचिन वाजे यांना सोबत घेऊन माझ्यावर आरोप केले होते. त्यांनी आरोप केल्यानंतर माझी चौकशीही करण्यात आली. चौकशीनंतर हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यावेळी हायकोर्टानं माझ्या विरोधात पुरावे नसल्याचा निकाल दिला. ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर आरोप झाले, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. ते प्रकरण निकाली निघत असतानाच आता मी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला, असं नवं कारस्थान रचण्यात आलं," असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.