नाशिक Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीनं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावाला पक्षातून विरोध होत असल्याचं दिसून येतंय. भारती पवार या धमकावत असून विश्वासात घेत नसल्याचं सांगत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. युवा जिल्हाध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळं महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.
भारती पवार कार्यकर्त्यांची गळचेपी करतात : दिंडोरी मतदारसंघात महायुतीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत ही जागा पक्षाला जिंकता यावी यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे मात्र उमेदवार डॉ भारती पवार यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. बैठकीत तुम्ही माझी बदनामी करता तुम्हाला माझ्याशी दुश्मनी घ्यायची आहे का, अशा धमकावणीची भाषा करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार या कार्यकर्त्यांची गळजेपी करत असल्याचा घणाघाती आरोप करत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वसह सर्व पदांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्याकडं पाठवलाय. बर्डे पाटील यांच्या पाठोपाठ उपाध्यक्ष वैभव कावळे यांनी ही राजीनामा दिल्यानं दिंडोरी मतदारसंघात डॉ भारती पवार यांच्या अडचणीत वाढ झालीय.