मुंबई Maharshtra Cow Rajya Mata :-महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. तसेच गायीच्या पालन पोषणासाठी महायुती सरकारकडून भरीव मदतीची योजना जाहीर करण्यात आलीय. खरं तर गाईला राज्य गोमातेचा दर्जा दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, सरकारच्या या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत, तर संजय राऊतांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.
मग राहुल गांधींच्या कानाखाली मारणार का? : एकीकडे खासदार संजय राऊत यांनी राज्य गोमातेवरून राज्य सरकारवर टीका केली असताना दुसरीकडे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. इंडिया आघाडीतील मुख्य नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. त्याच राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत बसले होते. आताही त्यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत. मग सावरकरांबद्दल तुम्हाला एवढा आदर आणि प्रेम असेल तर ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, त्याच राहुल गांधींच्या कानाखाली तुम्ही मारणार का? असा प्रतिप्रश्न संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.
विरोधकांकडे टीकेसाठी कोणतेही मुद्दे नाहीत: गोमातेबद्दल सर्वांना प्रेम असून, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जो बळीराजा, अन्नदाता शेतकरी आपल्या गोमातेला मुलांप्रमाणे सांभाळतो, त्या गोमातेला राज्य गोमातेचा दर्जा दिला तर यात सरकारने काय चुकीचं केलं? असा सवालही शिरसाटांनी विरोधकांना विचारलंय. सध्या विरोधकांकडे टीका करण्यास कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून कुठल्याही विषयावर ते टीका करताहेत. गाईला राज्य गोमाता घोषित केल्यानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. पण विरोधकांना पोटशूळ उठला आहे, असा जोरदार पलटवार आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. संजय शिरसाट यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत नेमके काय म्हणाले होते? : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गायीबद्दल काय भूमिका होती? आणि सावरकरांनी गायीबद्दल काय लिहिले आहे? हे एकदा सत्तेतील नेत्यांनी वाचायला हवे. सध्याचे सरकार हे बैलपुत्र असून, बैलांच्या विचारांचे सरकार आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आमचा गाईबद्दल आदर आहे. परंतु ज्या सावरकरांनी गायीबद्दल नकारात्मक लिहिले आहे. त्याच गायीला राज्य शासनाने राज्य गोमाता घोषित केलं आहे. त्यामुळं सावरकरांच्या विचारांच्या विरोधात हा निर्णय सरकारनं घेतल्यामुळं त्यांना सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याची खरमरीत टीका शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी केली होती. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गोमांस निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कत्तलखाने उघडण्यात आलेत. शासनाने परवानगी दिलीय. आता सरकार सत्तेतून जाण्याच्या वेळी, असा निर्णय घेत असेल तर त्यात वास्तव असायला हवे, राजकारण नाही," अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोमांसवरून केंद्र सरकारवर केलीय.
जनतेच्या मनात गोमातेबद्दल अत्यंत आदर- हाके:आपल्याकडे भारतीय संस्कृती, परंपरा ही मोठी आहे. आपल्या देशाच्या परंपरा आणि संस्कृतीत गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विरोधकांना आपली परंपरा आणि संस्कृती याची माहिती नाही. जर त्यांना गाईचे महत्त्व कळलं असतं तर त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं, असा टोला भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावलाय. सध्या सर्व काही चांगलं होत असताना लोकांच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण करायची आणि निवडणुकीच्या अगोदर त्याचा फायदा उचलायचा हे सध्या विरोधकांकडून सुरू आहे. या देशातील तमाम जनता आणि अन्नदाता यांच्या मनात गोमातेबद्दल अत्यंत आदर आणि प्रेमाची भावना आहे हे सर्व जगाला माहीत आहे. परंतु निवडणुकीच्या आधी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे राज्य सरकार जे निर्णय घेताहेत, त्यावरून उगाच टीका करायची आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हे विरोधकांकडून सुरू आहे. पण यात ते यशस्वी होणार नाहीत, असंही भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितलं.
मुद्दे नसल्यानं विरोधक वैफल्यग्रस्त- चव्हाण :एकीकडे गाईला राज्य गोमातेचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या निर्णयाचे सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे, मात्र विरोधकांनी यावर टीका केली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की, गाईला आपण माता मानतो. तिच्यामध्ये 33 कोटी देव पाहतो आणि जर सरकारने गाईला राज्य गोमातेचा दर्जा दिला तर यात गैर काय आहे? उलट जी शेतकऱ्यांची, सामान्यांची गाईबद्दल प्रेमाची, आदराची भावना आहे, त्या भावनेचा विचार करून सरकारने चांगलाच निर्णय घेतला आहे. परंतु सध्या विरोधकांकडे टीका करण्यासारखे कोणतेही मुद्दे नसल्यानं ते वैफल्यग्रस्त झाल्याची टीका सूरज चव्हाण यांनी विरोधकांवर केलीय. महायुती सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. ज्यामुळं तळागाळातील लोकांना त्याचा फायदा होतोय. आपण सर्वच गाईला दैवत मानतो. सरकारने गाईला राज्य गोमाता दर्जा दिल्यामुळं एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. पण विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने विरोधक टीका करताहेत, असं "ईटीव्ही भारत"शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
- "राज्यातील शाळासुद्धा अदानींकडं"; विरोधक म्हणाले, "महाराष्ट्राचा सातबारा..." - Vijay Wadettiwar
- आरोग्य खात्याचा 3 हजार 200 कोटींचा महाघोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा सनसनाटी आरोप - Vijay Wadettiwar Allegation