नागपूर Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षामधील नेत्यांमध्ये अजूनही एकवाक्यता निर्माण झाली नसल्यानं ताणतणाव वाढत आहे. सूर जुळून येत नसल्यानं आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. भिवंडी आणि सांगलीच्या जागांवर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटानं परस्पर आपले उमेदवार जाहीर केल्यामुळं हा तणाव आणखी वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नागपूर येथे काँग्रेसच्या महत्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) उपस्थित होते. तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं पुन्हा या विषयावर बैठक घेतली जाणार आहे.
आम्हाला सांगलीचा इतिहास, भूगोल माहीत आहे : संजय राऊत हे काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. सांगली जिल्ह्याचं समाजकारण, राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत आहे. सांगलीच्या कुठलाही व्यक्तीला विचारलं तर तो सांगेल की, सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे.
सांगलीच्या विचारधारेत काँग्रेस: सांगली जिल्ह्यात दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार हे निवडून आले आहेत. मात्र, आता बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपानं सक्षम उमेदवार आम्ही दिलेला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये. काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घरा घरात काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळं इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य कुणी करु नये. काँग्रेस पक्ष सव्वाशे वर्षाचा राष्ट्रीय पक्ष आहे.