मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावणार आहेत. उर्वरित लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जोरदार वेग आलाय. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची जोरदार टीका महायुतीकडून केली जात आहे. तर दुसरीकडं दक्षिण मध्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. काँग्रेसनं दक्षिण मध्य मुंबईवरील दावा सोडला असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांच्यासाठी आता काँग्रेसकडून प्रचार केला जाणार आहे.
दोन मतदारसंघात काँग्रेस बॅकफूटवर? : दक्षिण मध्य मुंबई आणि सांगली अशा दोन मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला होता. या दोन्हीपैकी एकतरी मतदारसंघ मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, ठाकरे गटानं सांगलीसाठी आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळं ती जागाही काँग्रेसला सोडावी लागली. आता दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरील दावाही काँग्रेसनं सोडला आहे.
महायुतीनं आमची काळजी करू नये : मुंबईमधील काही मतदारसंघातून काँग्रेस आणि ठाकरे गटात अर्थात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. त्यातच मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख आणि नसीम खान नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "महायुतीला सांगणं आहे की, आमच्या महाविकास आघाडीत चांगल्या प्रकारे समन्वय आहे. पक्ष संघटना म्हणून पक्षश्रेष्ठींच्या कानावर काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण अस्लम शेख आणि नसीम खान यांच्यासह दिल्लीला गेलो होतो. मुंबईतील सहाही जागा महाविकास आघाडीच्या निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. त्यासाठी वाटेल ते योगदान आम्ही देण्यास तयार आहोत. महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांच्या प्रचारसभेत मी देखील उपस्थित राहणार आहे. कुरघोडी आणि खोटं बोलायची परंपरा भाजपाची आहे. उलट त्यांचेच उमेदवार त्या मतदारसंघातील जाहीर झालेले नाहीत. त्यामुळं महायुतीनं आमची काळजी करू नये."