महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"लोकसभा निवडणुकीत कांद्यानं आम्हाला...": मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली - CM Eknath Shinde - CM EKNATH SHINDE

CM Eknath Shinde : लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election Results 2024) नाशिक भागात कांद्यानं रडवलं. तर, सोयाबीन आणि कापसानं आम्हाला त्रास दिल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीनंतर बोलत होते.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फाईल फोटो (ETV BHARAT MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 8:28 PM IST

Updated : Jun 11, 2024, 8:41 PM IST

मुंबईCM Eknath Shinde: राज्यात पावसाला सुरुवात झाली, पण अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत आणि पर्जन्यमानाबाबत आढावा बैठक पार पडली. यानंतर शेती पीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील पाणी, शेती, पीक आणि उत्पादनाचे नियोजन यावर भाष्य केलं. "कांद्यामुळं लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कृषी मंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

कांद्याने आम्हाला रडवलं: "लोकसभा निवडणुकीत कांद्यानं आम्हाला रडवलं. मुख्यतः नाशिक पट्ट्यात मोठा फटका बसला. कांद्यामुळं आम्हाला लोकसभा निवडणुकीत मोठा त्रास झाला असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. तर मराठवाडा आणि विदर्भात कपाशी याच्यामुळं त्रास झाला. तसेच सोयाबीन, कपाशी आणि कांदा यांच्या निर्यातीवर आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. कपाशीला किमान आधारभूत किंमत तरी मिळाली पाहिजे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

कांद्याबाबत मुख्यमंत्री असं का म्हणाले? : गेल्या दोन-तीन वर्षात केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. कांद्याला भाव वाढले की केंद्र सरकार निर्यात बंद करते किंवा निर्यात मूल्य वाढवते. परिणामी भाव पडतात. यामुळं शेतकऱ्यांनी अनेक वेळा केंद्राकडं हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, केंद्रानं यात वेळ काढू केल्यामुळं राज्यासह अहमदनगर, शिर्डी, येवला, लासलगाव, निफाड, चांदवड, दिंडोरी, नांदगाव या भागातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला.

कांद्यामुळं महायुतीला फटका? : कांदा निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका बसल्यानं शेतकऱ्यांतून सरकारविषयी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असल्याचं दिसून आलं. मतदान करतेवेळी ईव्हीएम मशीनचे बटन कांद्यानं दाबून मतदान केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच मतदान करतेवेळी अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची गळ्यात माळ तसंच हातात दुधाची बाटली घेत मतदान केलं होतं. त्याचाच परिपाक म्हणून महायुतीच्या अनेक मातब्बर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला, अशी जोरदार चर्चा आहे.

गावी जाऊन मी शेती करतो : "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या मूळ गावी साताऱ्यात जाऊन शेती करतो. माझे आपोआप शेतीकडं पाय वळतात. काही लोकं टीका करतात की, मी हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करतो. पण मी जर गाडीतून गेलो तर 8-10 तास लागतील, या वेळेत मी कित्येक फाईलवर सही करतो. मी मुख्यमंत्री आहे. माझ्याकडं वेळ नसतो पण जे टीका करतात त्यांच्याकडं मी लक्ष देत नाही," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला. दरम्यान, आगामी काळात राज्यात 10 लाख बांबूची लागवड करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही : "राज्यात ११ जूनपर्यंत ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीनं कृषी विभागानं खरीप हंगामाचे नियोजन करावं. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जे बोगस बियांची विक्री करतील त्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावं. तसेच टंचाईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध होत नसेल तर त्याठिकाणी जिल्हा विकास निधीतून सोलर पंप बसविण्यासाठी आणि पाणी साठवणुकीसाठी प्लास्टीक टाक्या घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत," असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत विनोद तावडे, संकेत की चकवा? - BJP National President
  2. लोकसभा निवडणुकीनंतर 'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण, 10 कोटींच्या निधीची तरतूद - Waqf Board Fund
  3. विनोद तावडेंना भाजपात मिळणार मोठी जबाबदारी?,चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान - Chandrakant Patil
Last Updated : Jun 11, 2024, 8:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details