मुंबई/ठाणे Ladki Bahin Kutumb Bhet Campaign : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या जबरदस्त फटक्यानंतर त्यातून सावरण्यासाठी महायुतीनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली गेलेली ही योजना विशेष करून महिला मतांची टक्केवारी महायुतीकडं खेचण्यासाठी अतिशय फायदेमंद ठरेल, अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांना आहे. परंतु अशा परिस्थितीत बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेले लैंगिक अत्याचार प्रकरण त्यासोबत राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटना याकरता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंमलात आणण्यामागे जो उद्देश होता तो मागे पडताना दिसत आहे.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV BHARAT Reporter) 'लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिम' : राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट' योजना अंमलात आणली. आता याचा कितपत फायदा महायुतीला होणार हे बघावं लागणार आहे.
"'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवलं. महायुतीच्या विजयासाठी या योजनेसाठी शिवसैनिक घरोघरी जाणार आहेत. मी आजपासून यांची सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच प्रत्येकाने 15 कुटुंबाची भेट घ्यायची आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळाला की नाही हे तपासायचं आहे. जर योजनेचा फायदा मिळाला नसेल तर त्याची अडचण दूर करा आणि त्यांना मार्गदर्शन करा. इतर योजनेच्या संदर्भात देखील अचूक माहिती त्या परिवाराला द्यायची आहे." - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महायुतीत श्रेय वादाची लढाई : राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत द्यायला महायुती सरकारनं सुरुवात केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या योजनेमुळं महायुती सरकारला याचा चांगला फायदा होईल. त्याचबरोबर महिला मतांची टक्केवारी आपल्याकडं खेचण्यात त्यांना यश येईल, अशी अपेक्षा महायुतीच्या सर्वच नेत्यांना आहे. त्यातच या योजनेचं श्रेय घेण्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली.
'मुख्यमंत्री' शब्दाला बगल : अजित पवारांनी या योजनेचा गाजावाजा करताना यातून 'मुख्यमंत्री' या शब्दालाच बगल दिली. या योजनेविषयी स्वतःची स्वतंत्र जाहिरात निर्माण करून महायुतीच्या भाजपा आणि शिंदे गटाला एका प्रकारे झटका देण्याचं काम केलं. तर दुसरीकडं भाजपानं सुद्धा या योजनेविषयी देवेंद्र फडणवीस अर्थात 'देवा भाऊ' यांना पुढे करत ही योजना 'हाय जॅक' करण्याचा प्रयत्न केला. अशात आता या योजनेचं श्रेय घेण्यासाठी शिंदे गटसुद्धा पुढे सरसावला.
'लाडकी बहीण'च्या प्रचारासाठी 200 कोटी : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ला 45000 कोटी लागणार आहेत. राज्य सरकारनं इतर सर्व योजनांसाठी असलेला निधी लाडकी बहीण योजनेत लावल्या कारणानं, त्याचा फटका शेतकरी कुटुंबांना बसला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्यात येणारी मदत यामुळं बंद झाली, असं वृत्त सर्व ठिकाणी पसरलं. या 'लाडकी बहीण' योजनेच्या प्रचारासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च केला. त्याकरता विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला.
विरोधकांचा आरोप : इतर योजनांचे पैसेही बंद झाल्याच्या कारणानं महायुती सरकारनं ज्या पद्धतीचा गाजावाजा करत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली त्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं. राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादामध्ये अडकले आहे. या योजनेमुळं इतर शासकीय योजनांचा खोळंबा झाला असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
दररोज 15 कुटुंबांची भेट घेतली जाणार : 'लाडकी बहीण' योजनेमुळं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये. त्याचबरोबर या योजनेचा फटका इतर योजनांना बसला नाही. हा उद्देश घेऊन आता मुख्यमंत्र्यांनी, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट' अभियानाला सुरुवात केली. शिवसेना शिंदे गटाकडून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या संदर्भात मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार तसेच कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. या अभियानाद्वारे दररोज 15 कुटुंबांची भेट घेतली जाणार आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा ज्यांना लाभ झाला आहे अशा कुटुंबांना आणि ज्यांना याचा लाभ झालेला नाही, त्यांना कशा पद्धतीने लाभ दिला जाऊ शकतो याकडं लक्ष दिलं जाणार आहे.
'लाडकी बहीण योजने'मुळं परिणाम झालेल्या इतर योजना? : विशेष म्हणजे, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राबवत असताना 'लेक लाडकी', 'लखपती योजना', 'मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना', 'मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना', 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना', 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना', 'मुख्यमंत्री वयोश्री योजना', 'कामगार कल्याण योजना', 'मुख्यमंत्री कृषी पंप योजना', 'महिला बचत गटासाठी विविध योजना' अशा प्रामुख्याने 10 योजना संदर्भात कुटुंबांना माहिती दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळं या इतर योजनांवर त्याचा काही परिणाम झाला नाही हे त्यात स्पष्टपणं जनतेला सांगण्यात येणार आहे. सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती आणि बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, त्यासोबत मालवण राजकोट येथे पडलेला शिवरायांचा पुतळा या कारणाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पूर्णता कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये याच उद्देशाने महायुती सरकार पावलं उचलत आहे.
हेही वाचा -
- लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम आली; तरीही बँकांसमोर महिलांची गर्दी... काय आहे कारण? - Ladki Bahin Yojana
- "...तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काढून घेईन", आमदार रवी राणांचं वादग्रस्त विधान - Ravi Rana On Ladki Bahin
- 'लाडकी बहीण' योजनेमुळं सावत्र भावाच्या पोटात दुखू लागलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला - Majhi ladki Bahin Yojana