मुंबई : नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांना कोपरखळ्या आणि चिमटे काढत सभागृह गाजवलं. विशेष म्हणजे याप्रसंगी निमित्त जरी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाचं असलं, तरी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढायची संधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोडली नाही. तर जयंत पाटील यांनीही त्यांच्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलं.
नाना पटोले यांनी वाट मोकळी करून दिल्यानं... :राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांची प्रशंसा केली. बाळासाहेब भारदे यांच्यानंतर सतत 2 वेळा हे पद भूषविणारे ते पहिले अध्यक्ष आहेत, असं सांगत नार्वेकर यांची विद्वत्ता, वकृत्व, अभ्यासूवृत्ती ही त्यांची खुबी असल्याचं त्यांनी म्हटलं. "मागील 5 वर्षाचा काळ हा महाराष्ट्रातील संक्रमण काळ होता. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्यांच्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. अशा परिस्थितीत मागच्या अडीच वर्षात त्यांनी अग्निपरीक्षा दिली असून कोकणचा सुपुत्र या अग्नीपरीक्षेत 100 टक्के सोन्यासारखा खरा ठरला," अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचं कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांचे विशेष आभार मानले आहेत. "नाना भाऊ तुमचे विशेष आभार. कारण, तुम्ही वाट मोकळी करून दिल्यानं नार्वेकर यांना संधी भेटली," असं मुख्यमंत्री म्हणाले.
अजित पवार आले आणि आता 24 बाय 7 असं काम सुरू झालं : अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांची भरभरून प्रशंसा केली. " 'कर नाही त्याला डर, उसका नाम राहुल नार्वेकर...' असं सांगत वास्तविक अध्यक्ष डाव्या बाजूची काळजी जास्त घेतात. परंतु यंदा जनतेनेच डाव्या बाजूच्या सदस्यांची जास्त काळजी घेतली आहे," असा टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला. "राहुल नार्वेकर यांनी खरी- खोटी शिवसेना कोणती याचा निर्णय देताना त्यांनी संयम ठेवला. विधानसभा निवडणुकीत जनतेनेच राहुल नार्वेकर यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. अगोदर मी आणि देवेंद्र फडणवीस होतो त्यानंतर अजित पवार आले आणि 24 बाय 7 असं काम आता सुरू झालं," असं सांगत एकनाथ शिंदें म्हणाले.