मुंबई Lok Sabha Election 2024 : बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही आमचीच शिवसेना असल्याचा छातीठोकपणे दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेवर इतकी नामुष्की ओढवली जाईल असं शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदेसोबत गेलेल्या खासदार, आमदारांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना शिंदे यांच्याकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुद्धा भाजपाच्या दबावामुळं त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की एकनाथ शिंदे (CM Eknath Shine) यांच्यावर ओढवली आहे.
अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी : दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राखी बांधणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. अजून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही फार कठीण अवस्था झाली आहे. भाजपाच्या वाढत्या दबावाखाली ते पूर्णतः झुकले असून नाराज खासदारांना आणि नेत्यांना काय उत्तर द्यावं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
सहयोगी पक्षाच्या विद्यमान खासदारांचा बळी: अबकी बार देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार हा भाजपाचा स्पष्ट नारा आहे. त्यातही भाजपाचं कमळ चिन्हावर ३७० खासदार निवडून येतील असा आत्मविश्वासही भाजपाला आहे. परंतु, या ३७० च्या नादात सहयोगी पक्षाच्या विद्यमान खासदारांचा बळी जात आहे. याचीच प्रचिती महाराष्ट्रात आलीय. सुरुवातीला मुंबई उत्तर पश्चिम (वायव्य) मतदार संघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आणि रामटेकचे कृपाल तुमाने या दोघांचे तिकीट कापण्यात आले. यावरूनच शिंदे गटात मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी सुरू असताना आपली खासदारकी वाचावी यासाठी दोन आठवड्यापासून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ठिय्या देणाऱ्या यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचंही तिकीट अखेर कापण्यात आलं.
४ खासदारांचा पत्ता कट: भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती. त्यांच्याबाबत नकारात्मक सर्वेक्षण अहवाल भाजपानं सादर केल्यामुळं त्यांचं तिकीट कापण्यास एकनाथ शिंदे यांना भाग पाडलं गेलं. तर हिंगोलीमध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी घोषित केली. भाजपाच्या दबावापुढे त्यांची ही उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर आली. हिंगोलीमधून एकनाथ शिंदे यांनी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर नाराज हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम मधून उमेदवारी दिलीय. अशाप्रकारे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडं असलेल्या विद्यमान १३ खासदारांपैकी ४ खासदारांचा पत्ता कट केला आहे.
विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट : एकनाथ शिंदे यांचं टेन्शन इथेच संपलेलं नाही. कारण भाजपाचा वाढता दबाव अजूनही त्यांच्यावर आहे. एकनाथ शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून त्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपा इच्छुक आहे. तर हेमंत गोडसे हे आपली खासदारकी वाचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असून एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी घोषित करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करूनही उमेदवारी घोषित न झाल्यानं अखेर स्वतःचा प्रचार त्यांनी सुरूही केला आहे. हातकणंगले मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केलीय. तिथे सुद्धा स्थानिक भाजपा नेत्यांकडून त्यांच्या नावाला प्रचंड विरोध होत आहे. अशा परिस्थितीत हेमंत पाटील यांच्याबरोबर जे झालं ते धैर्यशील माने यांच्याबरोबर सुद्धा होऊ शकतं या भीतीने शिंदे गटाचे नेते भयभीत झाले आहेत.
मुख्यमंत्री स्वतःच्या पुत्राची उमेदवारी घोषित करू शकत नाहीत: रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून नारायण राणे हे उमेदवारीसाठी आक्रमक झाले असून इथेही शिंदे गटाचे किरण सामंत यांना उमेदवारी मिळणं मुश्किल झालं आहे. भाजपाकडून सर्वेक्षणाचा अहवाल दाखवून शिंदे गटाच्या अनेक विद्यमान खासदार आणि नेत्यांचे पत्ते कापण्यात आले. याचाच फटका अमरावतीमध्ये शिंदे गटाचे नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनाही बसला आहे. भाजपाकडून तिथे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र पूर्णतः हतबल झाले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष असून त्याचा सामना त्यांना दररोज करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या उमेदवारीची घोषणाही करण्यात शिंदे यांना वाट पाहावी लागत आहे. भाजपाला ठाणे आणि कल्याण यापैकी एक जागा हवी आहे. अशा परिस्थितीत करावं तरी काय करावं? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पडलाय.