छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Mahayuti Seat Allocation : लोकसभा निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित असून राज्यात अद्याप जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. भारतीय जनता पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली असली तरी यात महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना प्रत्येकी साडे सहा जागा मिळतील असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय. तसंच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 35 जागांवर लढणार असून उर्वरित 13 जागा दोन पक्षांसाठी देणार आहे. त्यामुळं दोघांना किती जागावर लढवा लागेल हे माहीत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांना यश मिळत नाही आणि तसंच काहीसं होणार आहे. आजही तिकडं गेलेले लोक खासगीत येऊन चुकलो असं म्हणतात त्यामुळं यांच्यात काही खरं नाही असं देखील खैरे म्हणाले.
प्रकाश आंबेडकर मोठे नेते : पुढं ते म्हणाले, "शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, शरद पवार, वंचित यांची आणि सोबत असणाऱ्या मित्रपक्ष यांची यादी जाहीर होईल. आधी देखील प्रकाश आंबेडकर सोबत येण्याबाबत बोलले होते. त्यावेळी शिवशक्ती-भीमशक्ती अशी हाक देण्यात आली. भाजपासोबत नसला तर सोबत राहू असं पण ते म्हणाले होते. आता तर प्रकाश आंबेडकर खूप मोठे झाले आहेत. भाजपा विरोधात लढण्यासाठी ते सोबत आले आहेत. त्याबरोबर मुस्लिम मतदार देखील सोबत असल्यानं फायदा होईल. वातावरण चांगलं असल्यानं फायदा होईल आणि आम्ही 35 जागा जिंकू", असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय.