रांची Jharkhand CM :झारखंडमध्ये 31 जानेवारीच्या संध्याकाळपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आलंय. चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 1 फेब्रुवारीला दिवसभराच्या गदारोळानंतर रात्री उशिरा राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी नवनियुक्त विधिमंडळ पक्षनेते चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं.
आज शपथविधी : गुरुवारी रात्री साडेदहा वाजता चंपाई सोरेन आणि आलमगीर आलम यांना राजभवनात बोलावण्यात आलं. राजभवनात पोहोचल्यानंतर रात्री 11.15 वाजता राज्यपालांनी चंपाई सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीबाबतचं पत्र सुपूर्द केलं. आता राज्यपालांनी त्यांना 10 दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलंय.
9 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन : झारखंड विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंपाई सोरेन यांना 11 फेब्रुवारीपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागेल. यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत रंजक ठरणार यात शंका नाही. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार चंपाई सोरेन यांच्या नावावर खूश नसल्याचा दावा प्रमुख विरोधी पक्ष भाजपा करत आहे. त्यामुळे फ्लोर टेस्टच्या दिवशी हे रहस्य उलगडणार आहे.