मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी उमेदवारी भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. राजकीय पक्षांकडून आज शक्तिप्रदर्शन होत आहे. विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे.
Live updates
निवडणुकीच्या रिंगणात कोण?
- शिवसेना माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र शिवसेना पक्षाकडून की अपक्ष अर्ज दाखल केला, हे अद्याप अस्पष्ट आहे.
- बोगस कागदपत्रांमुळे चर्चेत आलेल्या आयएस अधिकार पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अहमदनर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरला आहे. यापूर्वी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराजय झाला होता.
- भाजपानं विधानसभा निवडणुकीसाठी आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामुळे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात एकूण 148 उमेदवार आहेत. माजी आमदार नरेंद्र मेहता हे ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून, तर सुधीर पारवे हे नागपूर जिल्ह्यातील उमरेडमधून निवडणूक लढवणार आहेत.
- वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राज्यसभा सदस्य मिलिंद देवरा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे) विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढणार आहेत.
- काँग्रेसने 288 पैकी 102 विधानसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीनं 268 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 84 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 82 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम-सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत 3,259 उमेदवारांचे एकूण 4,426 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीकरिता राज्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली.
हेही वाचा-
- भाजपामुळेच माझ्या पत्नीला कर्करोग झाला, अनिल देशमुखांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
- संगमनेर विधानसभेतून सुजय विखेंचा पत्ता कट; म्हणाले,"मॅनेज न होणारा उमेदवार..."