पुतण्यानंतर आता सख्खा भाऊ आणि वहिनी अजित पवारांच्या विरोधात पुणे Srinivas Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नेते मंडळी दोन्ही पवारांच्या बाजूनं गेलेले पाहायला मिळतंय. असं असताना दोन्ही पवारांकडून कुटुंबात कोणतीही फूट नसल्याचं वारंवार सांगितलं जात असताना आता अजित पवार यांच्या विरोधात पवार कुटुंबातील सर्वच जण एकत्र आले असून त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी देखील आता अजित पवार यांच्यावर थेट टीका केलीय.
याच्यासारखा नालायक माणूस नाही : देशभरात लोकसभा निवडणूक होत असून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असून पवार कुटुंबातील अनेकजण आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी रस्त्यावर येऊन प्रचार करत आहेत. काटेवाडी इथं झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले की, आजपर्यंत मी नेहमी अजित पवार यांच्या मागं उभा राहिलो आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही. या वयात शरद पवारांची साथ सोडणं चुकीचं असून अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचं यावेळी श्रीनिवास पवार यांनी बोलून दाखवलं. तसंच याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं असल्याचं देखील श्रीनिवास पवार म्हणाले.
वहिनींचीही टीका : श्रीनिवास पवार यांच्यानंतर अजित पवारांच्या वहिनी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनींही त्यांच्यावर टीका केलीय. त्या एका कार्यक्रमात म्हणाल्या की "कधीकधी परमेश्वर आपल्याला अशा वळणावर येऊन ठेवतात की जिथं आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ सर्वांसाठी खूपच संवेदनशील आहे. दुःखदायक आहे. आज ज्या वेदना आम्हाला होत आहे त्याच वेदना तुम्हाला देखील होत आहे. म्हणून आज आपण इथ एकमेकांचं सुख दुःख समजून घेत आहोत. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच आणि प्रत्येक कुटुंबात या गोष्टी होत असतात. आपल्या कुटुंबात कधीही अस घडलं नव्हतं पण आज ते घडलं आहे."
भावनिक साद : त्या पुढं म्हणाल्या की, "आज माझा आणि बापूंचा विचार असा झाला की आपल्या घरात जे वडीलधारी मंडळी आहे त्यांचा मान ठेवणं खूपच गरजेचं आहे. आपल्यासाठी पवार साहेबांनी काय केलं हे कोणालाही सांगायची गरज नाही. सर्वांनी साहेबांच्या मागं उभं राहिलं पाहिजे."साहेबांना आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातील 60 वर्षात कुणीही त्यांना मात दिली नाही. असं असताना आपण त्याला कारणीभूत व्हायचं का हे गालबोट आपण लावयाचं का हे आपल्याला पटतं का, अशी भावनिक साद यावेळी शर्मिला पवारांनी घातली.
हेही वाचा :
- माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं... ; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीबाबत सुळे यांची प्रतिक्रिया