मुंबई Prasad Lad on Ambadas Danve :पावसाळी अधिवेशनातील आज पाचवा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन घोषणा दिल्या. या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली. घाबरले रे घाबरले भाजपावाले घाबरले..., मनुवाद हटाव संविधान बचाव... अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या विरोधात लोकसभेतील भाषणानंतर खोटा नेरेटीव्ह सेट करण्यात आले. त्याला विरोध म्हणून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात निदर्शने केली. तर विरोधकांच्या आधी सोमवारी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना शिवीगाळ केली. या प्रकरणावरून आज सत्ताधारी आक्रमक होत त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. तसेच अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.
विरोधी पक्षाला शोभत नाही :आज सकाळी सत्ताधारी पक्षातील प्रसाद लाड, गिरीश महाजन, अशीष शेलार आणि गोपीचंद पडळकर आदी आमदारांनी घोषणाबाजी करत विरोधी पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं. तसेच अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली. त्यावरुन सत्ताधारी आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची आणि निलंबनाची मागणी केली. जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार, असं आमदार प्रसाद लाड म्हणाले. तसेच माझ्या दिवंगत आईला उद्देशून दानवे यांनी शिवी दिली आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधी पक्षाला शिवीगाळ करणं शोभत नाही. राजकारणाचा दर्जा एवढा घसरला आहे का? सभागृहात संसदीय भाषेचा उपयोग केला जातो. पण विरोधकांनाही पातळी ओलांडली असल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकावर केली.