संगमनेर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सुजय विखे यांची सभा झाली. या सभेदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वसंत देशमुख फरार झाले होते. वसंत देशमुख यांना अटक करण्यात यावी, यासाठी थोरात कुटुंबियांनी रात्रभर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता.
तपासासाठी 12 पोलीस पथकं : पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत वादग्रस्त वक्तव्य करून फरार झालेल्या वसंत देशमुख यांच्या तपासासाठी तब्बल 12 पोलीस पथकं रवाना केली होती. आज अखेर पोलिसांनी वसंत देशमुख यांना पुण्यातील एका अज्ञात स्थळावरुन ताब्यात घेतलंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी याबाबत माहिती दिली.
'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी घेतलेला संपूर्ण आढावा (Source : ETV Bharat) सुजय विखेंवर गंभीर आरोप : "वसंत देशमुख हे सुजय विखे पाटील यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सुजय विखे यांनी वसंत देशमुख यांना ते वक्तव्य करत असताना थांबवलं नाही. उलट ते देशमुखांना म्हणाले, तुम्हाला भाषण करायला यावेळी कमी वेळ मिळाला. पुढच्या वेळी जास्त वेळ देऊ. याचा अर्थ सुजय विखे वसंत देशमुख यांना प्रोत्साहन देत होते," असा गंभीर आरोप जयश्री थोरात यांनी सुजय विखेंवर केला.
गाड्यांची तोडफोड अन् जाळपोळ : वसंतराव देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. तालुक्यात अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळच्या घटना घडल्यानं संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, या प्रकारानंतर सुजय विखे यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत वसंतराव देशमुख यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. तसंच महिलेविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या दोषींवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणीही विखे यांनी केली होती.
हेही वाचा
- बडनेरात 'बंड'; दिवंगत आमदाराच्या पत्नी कडाडल्या, "मातोश्रीच्या सन्मानासाठी..."
- जागावाटपाचा घोळ असताना संजय राऊत झाले मवाळ; म्हणाले,"देवेंद्र फडणवीस यांच्याशी..."
- अमित ठाकरे आणि सदा सरवणकर एकाच दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज, 'राज'पुत्राला मिळणार कमळाची साथ?