कोल्हापुर Samarjeet Ghatge Joined NCP SP Sharad Pawar :कोल्हापुरातील राजकारणाचे विद्यापीठ अशी ओळख असलेल्या समरजीतसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळं येत्या कागल विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे यांच्यात आता लढत होणार आहे.
जनताच त्यांना धडा शिकवेल :यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, "केंद्रातील सत्तेच्या अडून आमच्या काही जुन्या सहकाऱ्यांच्या चौकशा लागल्या. या चौकशा सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील माता भगिनींनी हे थांबवा अन्यथा आम्हाला गोळ्या घाला, अशी भूमिका घेतली. मात्र, कुटुंबप्रमुखांनी चौकशीला सामोरं न जाता लाचारासारखं त्यांच्यासोबत गेले. हा कागलचा इतिहास नाही. कागलची जनता लाचारी कधीच खपवून घेणार नाही, येत्या निवडणुकीत त्यांना जनताच धडा शिकवेल, असा हल्लाबोल शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला.
माझ्यासाठी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा : "पक्षप्रवेशाची सभा ज्या गैबी चौकात झाली त्याच चौकात विधानसभेची शेवटची सभा घेतली जाईल, असं समरजीत घाटगेंनी यावेळी बोलताना सांगितलं. समरजीत घाटगे म्हणाले की, "येत्या विधानसभा निवडणुकीतील शेवटची सभा गैबी चौकातच होईल. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच उपस्थिती रहावं, कारण गेल्या वेळी याच गैबी चौकातून माझा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला होता. आता ती चूक दुरुस्त करून आमच्यासाठी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करावा," अशी मागणीही समरजीत घाटगे यांनी जाहीर सभेत केली.