पुणे: अभिनेता सैफ अली खानवर (Saif ali khan) झालेल्या चाकू हल्ल्यानंतर मुंबईसह बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील सामान्यांसह सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका करत आहेत. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून बोलण्याची संधी मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तर राजकीय लोकांना जेलमध्ये टाकण्यात येत होतं. राज्याची कायदा आणि व्यवस्था एकदम मजबूत आहे. छोटीशी घटना घडली की लगेच लक्षात आणली जाते आणि त्याचा पाठपुरावा केला जात आहे. सलमान खानचा एक विषय वेगळा असून वर्षानुवर्ष तो चालला आहे. सरकार मजबूत असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था देखील मजबूत आहे".
सोमय्या यांनी घेतली पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट : बांगलादेशातील रोहिंग्यांना प्रश्नांच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. पुणे शहरात रोहिंग्यांना जन्माचे दाखले देण्याच्या संदर्भात जागृती पाहायला मिळत आहे. २०२४ या वर्षात फक्त ६० लोकांना जन्माचे दाखले दिले आहेत. पण मालेगाव शहरात ४ हजार ३१८ लोकांना दाखले देण्यात आले आहे. तर अमरावतीत ४५३७, मुंबईत ५८ दाखले देण्यात आले आहे. राज्यातील अनेक शहरात बांगलादेशी रोहींग्यांना दाखले देण्यात आले. अश्या सगळ्यांना शोधून परत बांगलादेश येथे पाठवण्यात येणार आहे, असं यावेळी सोमय्या म्हणाले.