नागपूर :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 132 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळं एकटा भाजप पक्ष बहुमताच्या अगदी जवळ आहे. भाजपाचा स्ट्राइक रेट 90 च्या आसपास आहे. तसंच भाजपानं मित्रपक्षांना दिलेले 9 उमेदवारही विजयी झाले आहेत. शिवाय, पाच अपक्ष आमदारही भाजपसोबत असल्यानं तसं पाहिलं तर भाजपाचं संख्याबळ 146 होत आहे. भविष्यात गरज पडल्यास भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती त्यामुळे झाल्याचं दिसत आहे.
महायुतीतील सर्व आमदार युतीधर्म पाळतील :"भाजपाचं संख्याबळ जास्त असलं, तरी महायुतीतील घटक पक्षाचे आमदार युतीधर्म पाळतील," असा दावा राष्ट्रवादीचे नागपूरचे नेते प्रशांत पवार यांनी केला आहे. "सध्या कोणत्या पक्षाला कोणती मंत्रिपदं देता येतील, पालकमंत्री कोण असतील या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री शपथ घेतील," असं प्रशांत पवार म्हणालेत.
प्रशांत पवार यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) विरोधीपक्ष संघाच्या संपर्कात : "केवळ भाजपा पक्षाचेचं नाही, तर विरोधी पक्षाचे नेतेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आहेत," असा गौप्यस्फोट संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी केला आहे.
भाजपाला 146 आमदारांचा पाठिंबा कसा? : भाजपाच्या कमळ चिन्हावर जिंकून आलेले भाजपाचे 132 आमदार आहेत. शिवाय भाजपाला पाठिंबा देणारे मित्र पक्षाचे आणि अपक्ष 5 आमदार पुढे आले आहेत. यामध्ये बडनेरा येथून निवडणूक जिंकणारे रवी राणा, गंगाखेडचे अपक्ष आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे शाहूवाडीचे आमदार विनय कोरे, अशोक माने आणि शिवाजी पाटील यांनी आधीचं समर्थन जाहीर केलं आहे.
राष्ट्रवादी, शिवसेनेत भाजपाचे 9 आमदार : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 9 आमदार असे आहेत, जे काही दिवसांपूर्वीच भाजपामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना किंवा अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. स्थानिक मतदारसंघांच्या परिस्थितीनुसार त्या नऊ आमदारांना दुसऱ्या पक्षात पाठवण्यात आलं. यामध्ये मुरजी पटेल (अंधेरी- शिवसेना), प्रताप चिखलीकर, (लोहा- राष्ट्रवादी), निलेश राणे (कुडाळ- शिवसेना), विलास तरे (बोईसर- शिवसेना),राजेंद्र गावित (पालघर- शिवसेना), राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव- राष्ट्रवादी), संजना दानवे जाधव, (कन्नड- शिवसेना), विठ्ठल लंगे, (नेवासा- शिवसेना),अमोल खताळ (संगमनेर- शिवसेना) यांचा समावेश आहे. हे सगळे आमदार मूळचे भाजपाचे आहेत. त्या-त्या जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटल्यानं हे सर्वजण त्या-त्या ठिकाणी या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकून आले आहेत.
हेही वाचा
- साईबाबा संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ येणार; राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी?
- 'एकनाथ शिंदे म्हणतील देवेंद्र फडणवीस यांना करा मुख्यमंत्री'; चंद्रकांत पाटलांनी कशामुळे व्यक्त केला विश्वास
- 'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे; अमित ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत