मुंबई BJP Core Committee Meeting : भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (21 जून) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर पार पडली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका तसंच विधानसभेच्या जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित होते.
विधान परिषदेच्या जागांवर चर्चा : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली. परंतु, केंद्रीय नेतृत्वानं विनंती नाकारल्यानंतर ही पहिलीच कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली. येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत असून त्यामध्ये भाजपाच्या 5 जागांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारांची निवड आणि निवडणूक रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.