मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी शिवसेना आणि भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. महत्त्वाच्या खात्यावरून दोन्ही पक्षात अंतर्गत आग अजूनही धुमसत आहे. जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, तोपर्यंत ही आग धुमसतचं राहणार. गृहमंत्री, नगर विकास या खात्यांसह सभापती पदाची मागणी सुद्धा एकनाथ शिंदेकडून होत आहे. भाजपाला एकनाथ शिंदे यांच्या या मागण्या पूर्ण करणं शक्य नसल्यानं अंतर्गत धुमसत असलेल्या आगीचा वणवा येत्या दिवसात भडकू शकतो.
वणवा पेटतच राहणार : भाजपाला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित करायला 10 दिवसांचा कालावधी लागला. यादरम्यान मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. यानंतरही उपमुख्यमंत्री पदाबाबतही तोच सिलसिला कायम राहिला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते. ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी निवडणुकी निकालानंतर लगेचच भाजपाच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा दिला, त्यावरून ते उपमुख्यमंत्री पद घेणार हे निश्चित झालं होतं. परंतु एकनाथ शिंदे यांचं तसं नव्हतं. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार? की त्यांच्या पक्षाकडून आणखी कोणाला संधी देणार? याबाबत चर्चा ताणल्या गेल्या होत्या. अखेर अनेक विनंत्या करून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार झाले. परंतु एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असलं, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत हा वणवा पेटतच राहणार आहे.
एकनाथ शिंदे यांची कोंडी : विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीचा जनादेश जनतेनं दिला, ते पाहता राज्यात भाजपा सर्वात मोठा ठरला आहे. त्यांना 132 जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेनेनं 57 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 41 जागांवर विजय संपादित केला. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी राहतील, हे तेव्हाच निश्चित झालं होतं. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यास दुजोरा दिला होता. परंतु देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खात होतं, त्याप्रमाणे आपणाला गृह खातं मिळेल, अशी पूर्ण खात्री एकनाथ शिंदे यांना होती. पण ते देण्यास भाजपानं नकार दिल्यावर एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यासाठी आग्रही आणि अडवणुकीची भूमिका घेतल्यावर भाजपा त्यांना गृह खातं देण्यास तयार झाला असून त्या बदल्यात त्यांनी नगर विकास खातं भाजपाला सोडावं, अशी अट घातल्याची माहिती समोर आली आहे. या कारणानं आता चहूबाजूंनी एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे.