पाटणा (बिहार) Bihar Politics : बिहारचं राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत असून, सर्व पक्षांमध्ये सातत्यानं बैठका सुरू आहेत. आधी 'राजद'नं (RJD) आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. बेठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचं कौतुक केल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे भाजपाच्याही बैठका सुरू आहेत. पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते एकत्र बसून यापुढील काम कसं होणार यावर विचारमंथन करत आहेत. 'जेडीयू'चे (JDU) नेतेही नितीश कुमार यांची भेट घेत आहेत.
रविवारीही होणार बैठक : रविवारी सकाळी 10 वाजता 'जेडीयू' विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच 'एनडीए' विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. 'एनडीए' विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर 'जेडीयू' आणि भाजपाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटतील आणि त्यानंतर सामंजस्य करार तयार केला जाईल, अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे रविवारी सकाळी 10.30 नंतर राजभवनात जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हे राजभवनात जाऊन राजीनाम्याचं पत्र सुपूर्द करतील. तर दुसरीकडे 'एनडीए' आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी संमतीपत्रही राज्यपालांना सुपूर्द करतील, असं बोललं जात आहे.
'जेडीयू'-'राजद'मध्ये तणाव :'जेडीयू'चे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, 'नोकरीच्या बदल्यात जमीन घेणाऱ्याशी युती करू नये.' त्यांनी अप्रत्यक्षरित्या लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली आहे. दरम्यान, या सर्व राजकीय संकटांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पाटण्याला पाठवलं आहे. येथील राजकीय पेच ते त्यांच्या रणनीतीनुसार सोडवतील, अशी अपेक्षा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. तर दुसरीकडं भाजपाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांच्यासह झारखंडचे खासदार दीपक प्रकाश हे देखील या सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहेत.
शाह आणि नड्डा बिहारमध्ये येऊ शकतात : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी बिहारमध्ये येण्याची शक्यता आहे. राजीनाम्यानंतर नितीश कुमार हे 28 जानेवारीलाच पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. अशा परिस्थितीत या शपथविधी सोहळ्याला नड्डा आणि शाह देखील उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.
हे वाचलंत का :
- अखिलेश यादवांची काँग्रेससोबत युतीची घोषणा, उत्तर प्रदेशात देणार लोकसभेच्या 11 जागा
- बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार राहणार की NDA पुन्हा येणार सत्तेत, जाणून घ्या विधानसभेचं गणित