नाशिक : मालेगावातील बेरोजगार तरुणांना मार्केट कमिटीमध्ये नोकरीचं आमिष देत, एका व्यापाऱ्यानं तरुणांच्या नावानं 'नामको बँकेत' करंट अकाऊंट उघडून चक्क 100 कोटीचा आर्थिक व्यवहार करत त्यांची फसवणूक केली आहे.
काय आहे घटना? : मालेगावातील जवळपास 12 तरुणांना सिराज नामक व्यापाऱ्यानं मालेगाव मार्केट कमिटीमध्ये नोकरी लावून देतो असं आमिष दाखवलं. या तरुणांकडून बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांची कागदपत्रं जमा करून घेतली आणि त्यांच्या नावाने मालेगाव लोढा मार्केट येथील 'नाशिक मर्चंट बँकेत' सर्व अकाउंटवर करोडो रुपयांची उलाढाल केली. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचासंहिता लागू असताना, गेल्या 15 दिवसांपूर्वी असे बँक अकाऊंट उघडून जवळपास 100 कोटीची उलाढाल करण्यात आल्यानं, या तरुणांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडं धाव घेतली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली. दरम्यान या प्रकरणी फसवणूक झालेल्या युवकांना घेवून शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.
कागदपत्रांचा गैरवापर : "सिराज नामक व्यक्तीने मार्केट कमिटीमध्ये नोकरी लावून देतो असं सांगितलं. आमच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा घेतला आणि नामको बँकेत आमची खाती उघडली. त्यांनी आमच्या बारा जणांच्या नावावर करोडो रुपयांचा ऑनलाइन आर्थिक व्यवहार करत गैरवापर केला. याबाबत आम्ही बँकेला अर्ज करत बँक खात्यामधील रक्कम गोठवण्यास सांगितल्याची माहिती, फसवणू झालेल्या तरुणांनी दिली.
बँक खाते गोठवले : "बँकेत रीतसर कागदपत्रांच्या आधारे करंट खाते उघडण्यात आले. त्यातील व्यवहार हे नियमित आहेत. ऑनलाईन व्यवहार असल्यानं ते लगेच लक्षात येत नाही. मात्र, त्या युवकांनी मागणी केलेल्या अर्जाप्रमाणे त्यांना त्यांच्या खात्यांचे स्टेटमेंट देण्यात आले. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणं खाते आणि सध्याची खात्यातील रक्कम गोठवण्यात आली" असल्याचं नामको बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितलं.
हेही वाचा -