महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बारामतीत अजित पवारांचीच हवा; पुतण्याला चितपट करत साकारला शानदार विजय - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी पुतणे युगेंद्र पवार यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय.

Baramati Assembly Election Result 2024 battleground between Ajit Pawar VS Yugendra Pawar
अजित पवार युगेंद्र पवार (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2024, 10:22 AM IST

Updated : Nov 23, 2024, 6:07 PM IST

पुणे :बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Election Result 2024) अजित पवार (Ajit Pawar Win) यांनी 1 लाखाहून अधिक मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवलाय. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई बघायला मिळाली. अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिलं होतं. स्वत: शरद पवार यांची ताकदही युगेंद्र पवारांच्या पाठीशी असल्यानं बारामतीत यंदा अटीतटीची लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, अजित पवारांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवलाय.

मतदारसंघ पिंजून काढला : या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे 'बारामती'. बारामतीत घेतलेल्या प्रचार सभांमध्ये "युगेंद्र पवारांना निवडून द्या", असं भावनिक आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला होता. प्रत्येक गावामध्ये भेटी देण्याचा, सभा घेण्याचा आणि आपली विकास कामं, योजना तळागाळापर्यंत पोहोचवत अजित पवारांनी मतदारांना साथ देण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर आत्तापर्यंत केलेल्या कामांची उजळणी देखील त्यांनी यावेळी केल्याचं दिसून आलं. तसंच "लोकसभेला साहेबांना साथ दिली तशी साथ आता विधानसभेला मला द्या", असं देखील अजित पवार यांनी म्हटलं होतं.

2019 च्या निवडणुकीत काय घडलं? : 2019 मध्ये बारामती विधानसभेत अजित पवार यांनी भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव केला होता. अजित पवार हे 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. अजित पवार सर्वाधिकवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत.

हेही वाचा -

  1. 15 राज्यांतील विधानसभा आणि 2 लोकसभेचे आज निकाल: पुढच्या काही तासांत होणार चित्र स्पष्ट
  2. मतमोजणीला सुरुवात; पुणे जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
  3. निकालापूर्वीच मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी, पाहा व्हिडिओ
Last Updated : Nov 23, 2024, 6:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details