शिर्डी Lok Sabha Election 2024: देशात वाढलेली महागाई आणि बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र, यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे. तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असं आवाहन, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय.
पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक : शिर्डीतील अमृता लॉन्स येथे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आमदार सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, हेमंत ओगले, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, करण ससाने, शिवाजी नेहे, श्रीमती सुनीता भांगरे, मधुकर तळपाडे, शिवसेनेचे जगदीश चौधरी, संजय फड, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, दुर्गा तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ .जयश्री थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. सर्वत्र वाढलेली बेरोजगारी आणि महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, यावर सरकार बोलत नाही. धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. फसव्या जाहिराती मधून दिशाभूल होत आहे. आता जनता या लोकांना कंटाळली आहे. - बाळासाहेब थोरात, आमदार
मीडियावर दबाव टाकला जात आहे: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत चांगलं वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिन्याभर अत्यंत चांगलं नियोजन करा. सध्याच्या सरकार विरोधात कमीत कमी प्रत्येकाला 100 मुद्दे सापडतील. राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेलं आहे. सर्व क्षेत्रात अपयशी ठरत आहे. मात्र, मीडिया शांत बसून आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय अशी शंका देशाला निर्माण होत आहे. राज्यघटनेचा आणि सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा महाविकास आघाडीचा विचार घराघरात पोहोचवा यश आपलंच आहे, असं थोरात म्हणाले.