महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"निकालाच्या दिवशी महाविकास आघाडी फुटणार", आशिष शेलार यांचा दावा - Ashish Shelar On Mahavikas Aghadi - ASHISH SHELAR ON MAHAVIKAS AGHADI

Ashish Shelar : विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीनंतर निकालाच्या दिवशीच फूट पडणार असल्याचा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. "महाविकास आघाडीतील पक्ष स्वार्थासाठी एकत्र आलेत." असं आशिष शेलार म्हणाले.

Ashish Shelar
आशिष शेलार महाविकास आघाडीवर टिका (Source - ETV bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 7:19 PM IST

मुंबई Ashish Shelar :दोन महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. अशात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आशिष शेलार यांची प्रतिक्रिया (Source - ETV bharat Reporter)

उद्धव ठाकरेंना मुंबईचा वडापाव आवडत नाही : उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना शेलार म्हणाले, "उद्धव ठाकरे हे दिल्लीला महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी गेले होते. मला जास्त जागा द्या आणि मुख्यमंत्रीपद द्या, हीच त्यांची महत्त्वाची मागणी होती. उद्धव ठाकरे यांना मुंबईचा वडापाव सोडून आता दिल्लीची नळी निहारी आवडायला लागली आहे का? महाविकास आघाडी लवकरच फुटणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी येतील त्याच दिवशी महाविकास आघाडी फुटेल. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. शिवसेनेमध्ये फूट पाडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवल्या. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळाली असली तरी हव्या तशा जागा त्यांना मिळाल्या नाहीत. म्हणून आता त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून या निमित्तानं सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली." असं आशिष शेलार म्हणाले.

राजकारणातला शकुनी मामा म्हणजे संजय राऊत : "महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा म्हणजे संजय राऊत आहे. संजय राऊत सतत आमच्या विरोधात असतात. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं राज्याच्या राजकारणात विष कालवलं आहे. प्रवक्ते पद एका पक्षाचं भूषवायचं आणि भाषा दुसऱ्या पक्षाची बोलायची. मनामध्ये हेतू तिसरा ठेवायचा आणि चौथा पर्याय दुसऱ्याला द्यायचा, असं काम संजय राऊत करत आहेत." असं म्हणत आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे शांत तोपर्यंत ठीक : "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते विदेशामध्ये जाऊन देशातील लोकशाहीवर आलोचना व टीकाटिपणी करत आहेत. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी या देशातील सर्व यंत्रणा बिघडवण्याचं काम करत आहे. यामध्ये महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचं काम ठाकरेंची सेना करत आहे. परंतु त्यांनी हे लक्षात जरूर ठेवावं की, वातावरण बिघडवण्याचं काम जर त्यांनी सुरू केलं, तर त्याचा फटका त्यांनाही बसेल. आज राज ठाकरे यांच्या रस्त्यामध्ये तुम्ही सुपाऱ्या टाकत आहात. उद्या तुमच्या नेत्यांच्या दौऱ्यापुढे जर लोक आले तर कोल्हेकुई करू नका, पळता भुई थोडी होईल. मला राज ठाकरेंचा स्वभाव माहीत आहे. ते जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत ठीक आहे. म्हणून असले प्रकार ठाकरे सेनेनं करू नयेत." असं आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणाले.

बच्चू कडू यांनी अभ्यास करावा : आशिष शेलार पुढे म्हणाले, "आज शेतकऱ्यांसाठी जे काही महाराष्ट्र आणि केंद्र सरकार देत आहे त्याचा अभ्यास बच्चू कडू यांनी करावा. आतापर्यंत शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय दिलं? याचा अभ्यास सुद्धा बच्चू कडू यांनी करायला हवा. त्याचप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे."

काँग्रेसवर टीका : आशिष शेलार पुढे म्हणाले, "माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह जे म्हणाले आहेत ते पूर्णतः सत्य आहे. यावर विरोधकांची चुप्पी हीच त्यांच्या पापाची स्वीकृती आहे. त्यांचं मौन हेच त्यांनी कुकृत्य केल्याच्या पुरावा आहे. तसंच काँग्रेसची मुंबईतील न्याय यात्रा' ही बनवाबनवी पार्ट टू ची यात्रा आहे. मुंबईकर त्यांच्यावर सडेतोड हल्ला करतील." असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.

हेही वाचा

  1. "हा तर, चिंधीचोर नेता"; खासदार नरेश म्हस्के यांच्यावर सुषमा अंधारेंची जहरी टीका - Uddhav Thackeray
  2. हे मराठ्यांचे नव्हे मुस्लिमांचे नेते, भाजपा आमदार नितेश राणे यांचा जरांगे यांच्यावर 'प्रहार' - Nitesh Rane
  3. अडसूळ विरुद्ध राणा कुटुंबातील वाद चिघळण्याची शक्यता; कॅप्टन अभिजित अडसूळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला - Navneet Rana vs Anandrao Adsul
  4. माझी पोरं गाल, तोंड लाल करतील, तेव्हा कळेल- राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना इशारा - Raj Thackeray Slams Manoj Jarange

ABOUT THE AUTHOR

...view details