अमरावती Amravati Lok Sabha Constituency : सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आाघाडी यांनी अजूनही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. काही जागांवरील वाद अद्याप कायम असून, तो मिटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षनेतृत्वाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अमरावती मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकीट मिळाल्यामुळं शिवसेना नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडं अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी तर थेट लोकसभेतच जाणार असल्याचा निर्धार केलाय. त्यामुळं नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढलीय.
नवनीत राणांचा गेम करणार : अभिजीत अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असे जाहीर केलंय राणा यांना भाजपा, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच प्रहारचे बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे. हे सर्वच पक्ष माझ्या पाठीशी राहणार असून, सर्व मिळून नवनीत राणा यांचा गेम करणार - अभिजीत अडसूळ
तीन अर्ज घेतले : मागील वर्षभरापासून अमरावती लोकसभा मतदारसंघात आनंदराव अडसूळ किंवा मी उमेदवार राहील असे अभिजीत अडसूळ सातत्यानं सांगत आले आहेत. उमेदवारी अर्ज उचलण्याच्या पहिल्याच दिवशी अभिजीत अडसूळ यांनी स्वतःच्या नावानं एकूण तीन अर्ज घेतले आहेत. मी स्वतः निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे जाहीर करीत कोणाच्याही दबावाला बळी न पडता माझी उमेदवारी अमरावती लोकसभा मतदारसंघात कायम राहणार, असं देखील अभिजीत अडसूळ यांनी म्हटलंय.
राणांवर केली टीका : "राज्याचा मंत्री होणं ही सोपी गोष्ट नाही. असं असताना अमरावती जिल्ह्याचे प्रवीण पोटे हे पालकमंत्री असताना त्यांचा सातत्यानं 'बालकमंत्री' म्हणून राणा दाम्पत्यानं अपमान केला. पालकमंत्र्यांना 'बालकमंत्री' म्हणणाऱ्या राणांना भाजपाचे स्थानिक नेते कधीही विसरणार नाहीत. भाजपाचेच तुषार भारतीय तसेच त्यांचे आमदार असणारे भाऊ श्रीकांत भारतीय यांच्या घरावर राणाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीत भारतीय यांचे वृद्ध आई-वडील देखील जखमी झाले होते. राणांकडून मिळालेल्या जखमा भाजपाचे नेते, पदाधिकारी कधीही विसरणार नाहीत," असे अभिजीत अडसूळ म्हणाले.