महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयावर भाजयुमोचा हल्ला, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना चोप - BJP ATTACKS CONGRESS OFFICE

मुंबईत भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं. त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे.

Amit Shah Statement Controversy,  BJP yuva morcha workers attacked on congress party office in mumbai
मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयावर भाजयुमोचा हल्ला (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

मुंबई : राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून आधीच वातावरण तापलेलं असतानाच भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसनं अपमान केल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय.

छायाचित्रांवर शाईफेक : मुंबई कॉंग्रेसच्या राजीव गांधी भवनावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (19 डिसेंबर) सायंकाळी हल्ला केला. कार्यालयाची तोडफोड करुन त्या ठिकाणी असलेल्या सोनिया गांधी आणि इतर नेत्यांच्या छायाचित्रांवर काळी शाई फेकण्यात आली. तसंच या हल्ल्यामध्ये कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच कार्यालयाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी कार्यालयात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी आतील दालनात स्वतःला कोंडून घेतलं. हल्लेखोरांपासून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मुंबई पोलिसांनी भाजयुमो कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन त्यांना चांगलाच चोप दिला.

भाजयुमोच्या हल्ल्यानंतर कॉंग्रेस आक्रमक (ETV Bharat Reporter)

अशा भ्याड हल्ल्याला घाबरणार नाही : कॉंग्रेसचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत कॉंग्रेसने देशभरात आवाज उठवला. त्याविरोधात भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयावर भ्याड हल्ला केला. मात्र, कॉंग्रेस कार्यकर्ते अशा भ्याड हल्ल्याला घाबरणार नाही", असं मत राईन यांनी व्यक्त केलंय.

वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात आणि दालनात घुसण्याचा प्रयत्न भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला. कॉंग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजयुमो कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. 'आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसचा जाहीर निषेध' असे फलक कार्यकर्त्यांनी यावेळी हातात धरले होते.

लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाची गुंडगिरी : "अशा भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. या हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ऐकताच का कोणास ठाऊक, पण मनुवादी आरएसएस-भाजपानं नेहमी हेच केलंय", अशी टीका मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली. "अमित शाह यांनी बाबासाहेब आणि आंबेडकरी चळवळीचा अपमान केलाय. आता त्यांना वाचवण्यासाठी आणि लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा गुंडगिरीवर आलीय. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही? भाजपाच्या या गुंडांवर कठोर कलमांतर्गत कारवाई करावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी", अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली.

  • पोलिसांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि भाजयुमो कार्यकर्त्यांची झटापट झाली. घटनास्थळावरून 14 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की, भाजपाचे 2 खासदार रुग्णालयात; राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल
  2. अमित शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद; विधानभवन परिसरात 'मविआ' अन् 'महायुती'चं आंदोलन, पाहा व्हिडिओ
  3. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024: अमित शाहांविरोधात विरोधकांचं जोरदार आंदोलन; राहुल गांधींंच्या धक्क्यानं भाजपा खासदार जखमी झाल्याचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details