धुळे :राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज सध्या महाराष्ट्राच्या मैदानात आहेत. दरम्यान, आज अमित शाह धुळ्यात होते. यावेळी बोलताना त्यांनी थेट इंदिरा गांधींचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला. धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ते बोलत होते.
इंदिरा गांधी आल्या तरी... : प्रचार सभेत बोलताना अमित शाहांनी कलम 370 चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "काँग्रेसनं ज्या ज्या राज्यात सरकार बनवलं त्या राज्यांमध्ये त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. हरियाणा निवडणुकीत राहुल गांधी सांगत होते आम्ही जिंकू, पण तिथं निकाल आमच्या बाजूनं आला. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करण्याबद्दल बोलत आहेत, त्यांना सांगेन की, इंदिरा गांधी परत आल्या तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करू देणार नाही. राहुल गांधी यांना सांगू इच्छितो की, तुमची चौथी पिढी आली, तरी मी कलम 370 पुन्हा लागू करून देणार नाही."
उध्दव ठाकरे घरातून बाहेर पडत नव्हते : यावेळी बोलताना अमित शाहांनी उध्दव ठाकरेंवरही निशाणा साधला. "उध्दव ठाकरे कोरोना काळात कुठं होते? हा माझा त्यांना प्रश्न आहे. कोरोना काळात आम्ही जेव्हा दिल्लीत बैठक घ्यायचो, तेव्हा उध्दव ठाकरे घरातून बाहेर पडत नव्हते," असं म्हणत त्यांनी ठाकरेंनाही टोला लगावला.