नंदुरबार : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच अनेक दिग्गजांनी यंदा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय. गेल्या सात टर्मपासून सुरू असलेला ॲड. के. सी. पाडवी यांचा विजय रथ रोखण्यासाठी माजी खासदार, विद्यमान आमदार आणि माजी मंत्र्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत के. सी. पाडवी यांनी केवळ 2096 मतांच्या फरकाने आमश्या पाडवी यांच्याविरोधात विजय मिळवला होता. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व दिग्गजांनी आपली ताकद पणाला लावल्याचं बघायला मिळतंय.
सातपुड्यातील मतदार काँग्रेसबरोबरच : के. सी. पाडवी हे गेल्या 35 वर्षांपासून याच विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत विद्यमान विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी तत्कालीन शिवसेनेचे (उबाठा) नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या मदतीनं के. सी. पाडवी यांना पराजित करण्यासाठी कंबर कसली होती. टक्कर देण्यात त्यांना बऱ्यापैकी यशदेखील आलं होतं. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत के. सी. पाडवी विजयी झाले. काँग्रेस पक्षासाठी जमेची बाजू म्हणजे लोकसभा निवडणुकीत ॲड. के. सी. पाडवी यांचे चिरंजीव काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांना 1 लाख 20 हजारांहून अधिक मतं मिळाली होती. त्यामुळं काँग्रेस पक्षावर येथील मतदार सदैव प्रेम करत राहतील आणि ते काँग्रेसलाच साथ देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धनुष्य-बाण घेऊन पुन्हा उतरले रिंगणात : राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दिग्गज या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. शिवसेनेचे विद्यमान विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे या मतदारसंघातून पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुन्हा याच मतदारसंघात लक्ष लावून ठेवलंय.