पुणे : पुण्यात गुरुवारी (23 जाने.) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी काहीवेळ शरद पवार यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावरुन सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकत्र येणार, या आशयाची चर्चाही सुरू झाली. असं असतानाच आता अजित पवार यांनी बंद दाराआड चर्चेत नेमकं काय-काय बोलणं झालं याची माहिती दिलीय.
काय म्हणाले अजित पवार? :यासंदर्भात पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार म्हणाले की, "व्यवसायासंदर्भात जे कोणते प्रश्न आहेत, त्याबाबत मी चर्चा केली. यावेळी सहकार, कृषी, ऊर्जा तसंच एक्साईज खात्याबाबत चर्चा झाली. या चार विभागाचा संदर्भ त्यांच्याशी असल्यानं याबाबत चर्चा झाली," असं पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) एकमेकांच्या शेजारी बसणं का टाळलं? :सभेसाठी व्यासपीठावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार येताच त्यांच्या नावाची पाटी काढून त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवण्यात आली. यासंदर्भात विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी सांगितलं की, "सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवार यांच्याशी बोलायचं होतं. मी शरद पवार यांच्याशी कधीही बोलू शकतो. त्यामुळं मी बाबासाहेब पाटील यांना आमच्यामधील खुर्चीवर बसवलं. माझा आवाज एवढा मोठा आहे की दोन खुर्च्या सोडून बाजूला असलेल्या लोकांना देखील ऐकू येऊ शकतो. त्यामुळं काहीही वेगळा अर्थ काढू नये."
शरद पवार पवारांनीही दिलं सारखंच उत्तर : आज (24 जाने.) कोल्हापुरात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेजारी बसणं का टाळलं? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "बाबासाहेब पाटील यांनी विनंती केली. दोन-तीन गोष्टी तुमच्या कानावर घालायच्या आहेत, असं ते म्हणाले. त्यामुळं ते माझ्या शेजारी बसले. बाबासाहेब पाटील हे नवीन सहकार मंत्री आहेत. त्यांना माझ्याशी बोलायचं होत म्हणून मीच म्हटलं मग माझ्या बाजूला बसा."
हेही वाचा -
- काका-पुतण्या एकाच मंचावर; एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं, कार्यक्रमात काय घडलं? पाहा व्हिडिओ
- चहावाल्याने आग लागल्याची ओरड दिली अन्...निव्वळ अफवेनं ही घटना घडली, अजित पवारांची प्रतिक्रिया
- "एका महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, पण उद्धव ठाकरे...", नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? वाचा सविस्तर